खंडणी मागितल्याप्रकरणी दोन जण अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 17:56 IST2019-08-13T17:56:08+5:302019-08-13T17:56:16+5:30
तक्रार मागे घेण्यासाठी शेख जावेद उर्फ मौला शेख, शेख सुलतान शेख रहीम व शेख साबीर शेख रहीम यांनी प्रकाश बोथे यांना ३० हजार रुपयांची खंडणी मागितली.

खंडणी मागितल्याप्रकरणी दोन जण अटकेत
बुलडाणा : खंडणी मागितल्याप्रकरणी इक्बालनगरमधील दोन जणांना पोलिसांनी मंगळवारी दुपारी शहरातील जांभरुन रोडवरील एका हॉटेलमधून अटक केली. आरोपींकडून खंडणीची रक्कम जप्त करण्यात आली.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील लिपीक प्रकाश बोथे यांची चौकशी करण्यात यावी, अशी तक्रार इक्बाल नगरमधील शेख जावेद उर्फ मौला शेख याने दाखल केली होती. या तक्रारीवर अकोला येथील उपसंचालक कार्यालयात चौकशी सुरु आहे. तक्रार मागे घेण्यासाठी शेख जावेद उर्फ मौला शेख, शेख सुलतान शेख रहीम व शेख साबीर शेख रहीम यांनी प्रकाश बोथे यांना ३० हजार रुपयांची खंडणी मागितली. बोथे यांनी याबाबत शहर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. खंडणीप्रकरणी तडजोडीअंती २० हजार रुपये देण्याचे ठरले. मंगळवारी शहरातील जांभरुण रोडवरील एका हॉटेलमध्ये भेटण्याचे ठरले. शहर पोलिसांची टीम खंडणीबहाद्दरांवर वॉच ठेऊन होती. दुपारी १२ वाजताच्या सुमारास खंडणीचे १० हजार रुपये स्वीकारतांना पोलिसांनी इक्बाल नगरमधील शेख जावेद उर्फ मौला शेख, शेख सुलतान शेख रहीम यांना रंगेहाथ अटक केली. तर शेख साबीर शेख रहीम फरार झाला. आरोपींकडून खंडणीची रक्कम जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणेदार शिवाजी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक करुणाशिल तायडे, हेड कॉन्स्टेबल माधव पेटकर, दत्तात्रय नागरे, सुधीर मगर, अमोल खराटे, बंडू खराट, मोरे यांनी ही कारवाई केली.