वृक्षलागवडीसोबत वृक्ष संगोपन
By Admin | Updated: July 6, 2017 00:06 IST2017-07-06T00:06:09+5:302017-07-06T00:06:09+5:30
सिंदखेडच्या सरपंचाचा उपक्रम : स्वखर्चाने जगविली ११०० झाडे

वृक्षलागवडीसोबत वृक्ष संगोपन
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव बढे : सिंदखेडच्या सरपंच विमल कदम यांनी मागील वर्षी लावलेल्या १४०० झाडांपैकी ११०० झाडे स्वखर्चाने जगवून गाव व परिसरात वनराई निर्माण केली. तर यावर्षीसुध्दा वनविभागाच्या मदतीने त्यांनी ४०० झाडांची लागवड केली.
दोन वर्षापुर्वी मोताळा तालुक्यातील सिंदखेड या गावाची धुरा सरपंच विमल कदम यांनी सांभाळली. मागील दोन वर्षामध्ये गावामध्ये व परिसरामध्ये विविध विकास कामासोबत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व वृक्ष संगोपन केले. वृक्षारोपणाची फक्त फोटोपुरती चमको गिरी न करता झाडांना ट्रीगार्ड, ठिबकव्दारे पाणी यासारख्या सुविधा स्वखर्चाने दिल्या. त्याचा परिणाम म्हणून सिंदखेडमध्ये रस्त्याच्या दुतर्फा, शाळेत, ग्रामपंचायत परिसरात तसेच स्मशानभूमीत अनेक झाडे डौलाने उभी राहिली. तर गाव परिसरातील जंगलात मोठ्या प्रमाणात ग्रा.पं.च्या माध्यमातून वृक्षारोपा करण्यात आले. गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. यावर्षी सुध्दा विविध जातीच्या ४०० झाडांची लागवड करण्यात आली. यावेळी प्रामुख्याने सरपंच विमल कदम, उपसरपंच ज्योती मोरे, अर्जुन कदम, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र वैराळकर, ग्रा.पं.सदस्य तथा नागरीक उपस्थित होते. दरवर्षी त्याच त्याच खड्यात वृक्षारोपण न करता सिंदखेडच्या सरपंच विमल कदम यांचा वृक्षारोपणाचा प्रयत्न प्रेरणादायी आहे.