वृक्ष लागवड लोकचळवळ करावी - फुंडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2017 00:12 IST2017-07-06T00:12:54+5:302017-07-06T00:12:54+5:30
वसुंधरा फाउंडेशन, वन विभागाच्यावतीने दोन हजार वृक्षांची लागवड

वृक्ष लागवड लोकचळवळ करावी - फुंडकर
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी, हरितक्रांती घडविण्यासाठी व आपली भावी पिढी वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करा, हा उपक्रम हा लोकचळवळ करून आपल्याला भरभरून देणाऱ्या निसर्गाचीही परतफेड करा, असे आवाहन राज्याचे कृषी व फलोत्पादनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी केले.
वसुंधरा बहूद्देशीय संस्था तसेच वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जनुना तलाव शिवारात दोन हजार वृक्ष लागवडीचा शुभारंभ ना.फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी त्यांच्यासह आ.अॅड. आकाश फुंडकर, नगराध्यक्ष अनिता डवरे, उपनगराध्यक्ष मुन्ना पुरवार, जि.प. समाजकल्याण सभापती डॉ.गोपाल गव्हाळे, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, उपवन संरक्षक बी.टी. भगत यांची प्रमुख उपस्थिती होती.