हिवरखेड येथे शंभरावर जनावरे दगावली
By Admin | Updated: July 26, 2014 22:49 IST2014-07-26T22:49:28+5:302014-07-26T22:49:28+5:30
अज्ञात आजाराने जवळपास १00 जनावरे दगावल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

हिवरखेड येथे शंभरावर जनावरे दगावली
खामगाव : तालुक्यात दोन दिवसांच्या पावसानंतर हिवरखेड येथे अज्ञात आजाराने जवळपास १00 जनावरे दगावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एकाच गावातील एवढय़ा मोठय़ा प्रमाणात जनावरे दगावल्याने शेतकर्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. या पशुधन मालकांचे सुमारे दहा लक्ष रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. या प्रकारामुळे संपूर्ण खामगाव तालुक्यात खळबळ उडाली असून, पशुवैद्यकीय पथक गावात दाखल झाले आहे. मृग नक्षत्र सुरू होऊन दीड महिना उलटल्यानंतरही जिल्ह्यात पावसाचा थेंब नव्हता. त्यामुळे शेतकर्याजवळ होते नव्हते जनावरांचे वैरणही संपले होते. जनावरांना चारा शिल्लक नसल्यामुळे शेतकर्यांनी मिळेल त्या झाडपाल्यावर जनावरे जगवली. आता कोठे पावसाला सुरूवात झाली होती. तालुक्यात २२ जुलै रोजी अतवृष्टी होऊन तब्बल ८0 मि. मी. पाऊस पडला. या पावसानंतर हिवरखेड या गावात जनावरांना अचानक अज्ञात रोगाची लागण झाली व सुदृढ असलेले शेकडो गायी-गोरे मृत्युमुखी पडू लागली. हा प्रकार पाहून पशुधन मालक आवाक झाले. जनावरे नेमकी कशाने मरत आहेत, हे न कळणारे कोडे होते. यासंदर्भात पशुधन मालकांनी खामगाव पंचायत समितीला तातडीने घटनेची माहिती दिली. त्यानंतर लगेच आज शुक्रवार २५ जुलै रोजी खामगाव पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. एन. एच. बोहरा यांच्या नेतृत्वात एक पथक हिवरखेड येथे दाखल झाले. यामध्ये पशुधन पर्यवेक्षक डॉ. एन. जी. करंकार, डॉ.तिडके, डॉ. जे. एस. खुमकर यांचा समावेश होता. त्यांनी हिवरखेड येथे भेट देऊन मृत जनावरांची पाहणी केली व काही जनावरांचे शवविच्छेदन केले. या आपत्तीमध्ये हिवरखेड येथील लाला हटकर, अरविंद वाकोडे, नवृत्ती परसराम राऊत, रमेश कडाळे यांची प्रत्येकी दोन अशी १0, तर गोपाल सुगदेव हटकर यांची ८, विजय बाळू हटकर यांची ६, ज्ञानदेव कृष्णा धानखेडे यांची ६ जनावरे त्याचप्रमाणे विठोबा मनसाराम शिंगाडे यांच्या ५0 गायी व गोरे मृत्युमुखी पडले. सुनील शालीग्राम हटकर व लोखंडकार याची २२ जनावरे, तानाजी हटकर यांची १0 यासह २0 ते २५ शेतकर्यांची जनावरे अज्ञात रोगाने दगावली आहेत. या प्रकारामुळे परिसरातील शेतकरी तसेच पशुधन मालकसुद्धा धास्तावले आहेत.