शिष्यवृत्तीच्या परीक्षेसाठी एकही तासिका झालीच नाही!
By Admin | Updated: February 23, 2015 00:27 IST2015-02-23T00:27:53+5:302015-02-23T00:27:53+5:30
परीक्षेसाठी उरला एक महिन्याचा कालावधी; शिक्षण विभाग कुंभकर्णी झोपेत.

शिष्यवृत्तीच्या परीक्षेसाठी एकही तासिका झालीच नाही!
फहीम देशमुख /शेगाव (बुलडाणा): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणार्या पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी खुली गुणवत्ता शिष्यवृत्तीच्या परीक्षेसाठी जिल्ह्याभरातील बहुतांश शाळांमध्ये अतिरिक्त तासिका झाल्याच नसल्याचा ध क्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. परीक्षेसाठी फक्त एक महिना कालावधी उरला असल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणार्या पूर्व माध्यमिक इयत्ता चवथीच्या स्पर्धा परीक्षेच्या आधारे इयत्ता ५ वी ते ७ वी व माध्यमिक स्तरावर इयत्ता ७ वीच्या स्पर्धा परीक्षेच्या आधारे इयत्ता ८ वी ते १0 वी पर्यंत गुणवत्तेनुसार शिष्यवृत्ती दिली जाते. गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. यासाठी जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या शाळांमधे तीन महिन्यांपूर्वी इयत्ता ४ थी आणि ७ वीच्या विद्यार्थ्यांकडून फी भरून घेऊन अर्ज दाखल करून घेण्यात आले. या परीक्षा बुलडाणा जिल्ह्यात येत्या २२ मार्च रविवार रोजी विविध परीक्षा केंद्रांवर होणार आहे; मात्र जी परीक्षा होणार आहे त्याबाबत जिल्ह्यातील बहुतांश शाळांमधे तासिका झाल्या नाहीत. शाळेच्या वेळाव्यतिरिक्त सकाळी ९.३0 ते १0.३0 आणि ५.३0 ते ६.३0 या वेळेमध्ये या परीक्षेबाबत शिकविले जाणे आवश्यक आहे; मात्र याबाबत लोकमतने अनेक शाळांमध्ये भेटी दिल्या असता शिष्यवृत्तीच्या परीक्षेची तयारी करून घेतली नसल्याचे दिसून आले. अनेक शाळांमध्ये फी भरली, अर्ज दिले; परंतु परीक्षा केव्हा आहे, याची माहितीही विद्यार्थ्यांना नाही. नियमानुसार या परीक्षेसाठी अतिरिक्त तासिका घेऊन शिकविणे आणि तसे शिकविल्याची नोंदवही तयार ठेवणे आवश्यक आहे. यावरून शिक्षण विभागाने याकडे साफ दुर्लक्ष केल्याने आता २२ मार्च रोजी होणार्या परीक्षेत विद्यार्थी काय लिहितील, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील हजारो गुणवंत विद्यार्थ्यांचे आर्थिक व शैक्षणिक नुकसान होणार आहे.