पर्यटन विकासासाठी नियोजन नाही

By Admin | Updated: September 2, 2015 02:26 IST2015-09-02T02:26:11+5:302015-09-02T02:26:11+5:30

पर्यटन विकासाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे नियोजन समितीने पुढाकार घेण्याची मागणी.

There is no planning for tourism development | पर्यटन विकासासाठी नियोजन नाही

पर्यटन विकासासाठी नियोजन नाही

हर्षनंदन वाघ / बुलडाणा : जिल्ह्याला निसर्गरम्य वारसासह ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या मोठी परंपरा आहे; मात्र पर्यटनाच्या दृष्टीने जिल्ह्यातील अनेक स्थळे दुर्लक्षित आहेत. पर्यटनाच्या नकाशावर शेगाव, लोणार व सिंदखेडराजा या तीन प्रमुख शहरांच्या विकासासाठी घोषित आराखडे वादातच अडकले आहेत. या स्थळांव्यतिरिक्तही इतर पर्यटनस्थळे दुर्लक्षित असून, पर्यटन नियोजन आराखडा होणे गरजेचे आहे.
बुलडाणा जिल्ह्याच्या उत्तरेला गाविलगडचा डोंगर असून, तो सातपुडा पर्वताचा भाग आहे. दक्षिण भागात अजिंठा डोंगर आहे. निसर्गाने बुलडाणा जिल्ह्यात आपले सौंदर्य मुक्तहस्ते उधळले असले तरी या सौंदर्याचे सोने करण्याची क्षमता असलेले धोरण कागदावरच आहे.
शेगावमध्ये संत गजानन महाराज यांचे भव्य असे मंदिर आहे. येथील आनंद सागर या प्रकल्पामुळे तर या शहराची ओळख देशविदेशात पोहोचली आहे.
याठिकाणी दर्शनाच्याच एकमेव हेतूने नव्हे, तर पर्यटक म्हणून येणार्‍यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. या शहराच्या विकासासाठी राज्य शासनाने शेगाव शहर विकास आराखडा मंजूर केला होता; मात्र सहा वर्षे उलटले तरी कामे पूर्णत्वास गेलेली नाही.
जगप्रसिद्ध लोणार ठिकाण देशी-विदेशी अभ्यासकांसह पर्यटकांचे नेहमी आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. याठिकाणी असलेल्या विविध मंदिरांमुळे येथे पर्यटकांबरोबरच भाविकांची संख्या लक्षणीय आहे. या सरोवराचे संवर्धन व संरक्षणासाठी विकास आराखडा दहा वर्षांपूर्वी २२५ कोटींचा मंजूर करण्यात आला होता; मात्र केवळ १0 कोटींचा निधी विकासकामांसाठी दिला. त्यापैकी केवळ साडेपाच कोटीच खर्च झाले असून, झालेली कामेही निकृष्ट दर्जाची आहेत. १४00 प्रस्तावित पहिल्या टप्प्यातील घरकुलांपैकी फक्त ३५0 घरकुले पूर्ण झाली असून, पाण्याची वितरण व्यवस्था अपूर्ण आहे.मेहकरचा बालाजी तसेच तालुक्यातील साखरखेर्डा हे गावही महत्त्वाचे आहेत. मढ गावाच्या पुढे गेल्यास बुधनेश्‍वराचे पीठ मानल्या गेलेल्या या ठिकाणापासून पैनगंगेचा उगम झाला. या ठिकाणापासून अवघ्या काही अंतरावर जाळीचा देव हे महानुभाव पंथीयांसाठी महत्त्वाचे श्रद्धास्थळ आहे. येथे चक्रधर स्वामींचे मंदिर आहे. बुलडाणा शहरापासून काही अंतरावर स्वयंप्रकाश महाराज यांचे गिरडा पर्यटन केंद्र आहे; तसेच मलकापूर रस्त्यावरील राजूर घाटाच्या माथ्यावर प्रती तिरूपतीचे व्यंकटगिरी बालाजीचे मंदिर आहे, असा अनेक संपन्न वारसा लाभलेला असतानाही पर्यटन विकासाला केंद्र मानून विकासाचे नियोजन झालेले नाही. त्यामुळे पर्यटनासह रोजगार उपलब्ध होत असल्यामुळे जिल्ह्याचा विकास खोळंबला आहे.

Web Title: There is no planning for tourism development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.