सुप्रसिद्ध वारी भैरवगड येथील हनुमान मंदिरात धाडसी चोरी
By योगेश देऊळकार | Updated: January 15, 2025 15:07 IST2025-01-15T15:06:12+5:302025-01-15T15:07:36+5:30
चोरट्यांकडून साडे पाच किलो वजनाच्या दागिन्यांवर डल्ला

सुप्रसिद्ध वारी भैरवगड येथील हनुमान मंदिरात धाडसी चोरी
अझहर अली, योगेश देऊळकार, लोकमत न्यूज नेटवर्क, संग्रामपूर/खामगाव: अकोला, बुलढाणा जिल्ह्याच्या सिमेवरील सोनाळा पोलीस ठाणे हद्दीतील सुप्रसिद्ध वारी भैरवगड येथील हनुमान मंदिरात रात्री ३ वाजतादरम्यान अज्ञात चोरट्यांनी चांदीचे दागिने व दान पेटीतील रोकडवर डल्ला मारल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या धाडसी चोरीत सुमारे ३ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याने खळबळ एकच उडाली असून मंदिराच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
तिळ संक्रांतीच्या मध्यरात्रीनंतर पहाटे ३ वाजता दरम्यान चोरट्यांनी हनुमान मंदिराच्या मुख्य द्वारचे कुलूप फोडून हनुमान व गणेश मुर्तीवरील सुमारे ५ किलो ४५० ग्रॅमचे चांदीने बनवलेल्या विविध दागिन्यांवर हात साफ केले असून दान पेटी फोडून त्यातील ७० हजाराची रोकड घेऊन पसार झाले आहेत.
पहाटे तीन वाजता चोरट्यांनी द्वारचे कुलूप फोडून मंदीरात प्रवेश केला. मंदीरात सिसिटीव्ही कॅमेरे नसल्याने अज्ञात चोरट्यांची ओळख पटविण्याचे आहवान सोनाळा पोलीसांसमोर उभे ठाकले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच सोनाळा पोलीस ठाण्याचे ठाणेदार चंद्रकांत पाटील घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला आहे. यावेळी संस्थानचे सचिव डॉ. प्रमोद विखे उपस्थित होते. वृत्त लिहेपर्यंत सोनाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. याप्रकरणी सोनाळा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचरण
सोनाळा पोलिसांकडून अज्ञात चोरट्यांचा माग काढण्यासाठी ठसे तज्ज्ञ तसेच श्वानपथकाला पाचारण केले आहे. लवकरच ठसे तज्ज्ञ व श्वानपथक घटनास्थळी दाखल होणार असल्याची माहिती सोनाळा ठाणेदार चंद्रकांत पाटील यांनी दिली.
वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल
वारी भैरवगड येथील हनुमान मंदिरात धाडसी चोरीच्या पार्श्वभूमीवर खामगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, मलकापूर प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आहे.