लोणार सरोवराच्या पाणीपातळी होतेय वेगाने वाढ, पाणी कमळजा मातेच्या मुखवट्यापर्यंत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 16:45 IST2025-12-17T16:43:58+5:302025-12-17T16:45:00+5:30
पर्यटकांच्या आकर्षणचा केंद्रबिंदू असलेले लोणार सरोवरातील पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे. वाढत असलेल्या पाणीपातळीमुळे भीतीही व्यक्त केली जात आहे.

लोणार सरोवराच्या पाणीपातळी होतेय वेगाने वाढ, पाणी कमळजा मातेच्या मुखवट्यापर्यंत!
ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यावरणीय महत्त्व असलेल्या लोणार सरोवराच्या जलाशयातील पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. सरोवरातील पाणी प्राचीन कमळजा मातेच्या मंदिरातील मुखवट्यापर्यंत पाणी पोहोचले आहे.
यंदा चांगला पाऊस झाला. त्यामुळे पूर्वी बंद पडलेले नैसर्गिक जलस्त्रोत पुन्हा सक्रिय झाले असून, सरोवरातील पाण्याची पातळी वाढत आहे. वाढत्या जलस्तरावर नियंत्रण ठेवण्यासाठी वेळेवर उपाययोजना न झाल्याने सरोवराच्या जैवविविधतेसह धार्मिक वारशालाही धोका निर्माण होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सरोवराचा जलस्तर दिवसेंदिवस वाढतच आहे. हीच स्थिती कायम राहिल्यास येत्या काही दिवसांत कमळजा मातेचे मंदिर पूर्णतः पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. कमळजा माता हे लोणार शहराचे प्रमुख श्रद्धास्थान असून, पंचक्रोशीतील भाविक दर्शनासाठी येथे येतात. मात्र, वाढत्या पाण्यामुळे मंदिर परिसरात जाणे कठीण आहे.
सरोवराच्या काठावरील काही रस्ते पाण्याखाली गेले असून, मंदिराकडे जाणारा मार्ग अरुंद आणि धोकादायक बनला आहे. परिणामी भाविकांना दर्शनासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. भविष्यात परिस्थिती अधिक गंभीर झाल्यास दर्शनासाठी जाणेच अशक्य होण्याची भीती व्यक्त होत आहे. अनेक भाविकांनी सुरक्षित दर्शनाची व्यवस्था करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
सरोवराच्या पाण्याचा निचरा, संरक्षण भिंत उभारणी आणि पावसाळ्यापूर्वीची पूर्वतयारी या बाबींकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. उपाययोजना झाल्या असत्या, तर आजची परिस्थिती उद्भवली नसती, असे नागरिकांचे म्हणणे आहे. वाढत्या जलस्तरावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
पाण्यामुळे निर्माण झालेले धोके
कमळजा मातेचे मंदिर पाण्याखाली जाण्याची शक्यता.
मंदिराकडे जाणारा मार्ग धोकादायक.
भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर.
सरोवरातील जैवविविधतेला संभाव्य धोका.
बंदोबस्त तैनात करा !
कमळजा मातेच्या मंदिराच्या सुरक्षेसाठी तत्काळ बॅरिकेड्स, सूचना फलक आणि पोलिस बंदोबस्त तैनात करण्याची अपेक्षा भाविकांकडून व्यक्त होत आहे. प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास धार्मिक स्थळासह भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. सरोवराचा जलस्तर नियंत्रणात आणण्यासाठी आणि मंदिराचे संरक्षण करण्यासाठी तत्काळ ठोस निर्णय घ्यावेत, अन्यथा वाढते पाणी लोणारच्या धार्मिक व सांस्कृतिक वारशावर मोठा आघात ठरू शकतो.