चोरी करणाऱ्यास पाठलाग करून पकडले: चोरट्याला नागरिकांकडून चोप
By अनिल गवई | Updated: September 1, 2023 19:54 IST2023-09-01T19:53:39+5:302023-09-01T19:54:20+5:30
हंसराज नगरातील घटना

चोरी करणाऱ्यास पाठलाग करून पकडले: चोरट्याला नागरिकांकडून चोप
खामगाव: रात्रीच्या अंधाराचा लाभ घेत, घरात शिरून चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका चोरट्याचा प्रयत्न घरातील महिलेला जाग आल्याने फसला. हा प्रकार निदर्शनास येताच महिलेने आरडाओरड केली. त्यामुळे नागरिकांनी सतर्क होऊन चोरट्याचा पाठलाग करून पकडले. या चोरट्याला शहर पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले.
खामगाव शहरातील हंसराज नगरातील एका वस्तीमध्ये महादू रामदास जंजाळ यांच्या घरात शिरून एका चोरट्याने चोरीचा प्रयत्न केला. त्यानंतर या चोरट्याने एसटी महामंडळातील वाहक रामेश्वर ठाकरे यांच्या घराकडे चोरीसाठी मोर्चा वळविला. दरम्यान, पाठीमागील दरवाजाचा आवाज आल्याने ठाकरे आणि त्यांच्या पत्नीने चोर चोर अशी आरडाओरड सुरू केली. त्यावेळी नागरिकांनी सतर्क होत, चोरट्याचा पाठलाग सुरू केला.
या चोरट्याला पकडून नागरिकांनी शहर पोलीसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी महादू जंजाळ, रामेश्वर ठाकरे यांच्या तक्रारीवरून चोरट्या विरोधात शहर पोलीसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे हंसराज नगरात एकच खळबळ उडाली होती. नागरिकांनी या चोरट्याला चांगलाच चोप दिल्याचीही चर्चा परिसरात होत आहे.