समृद्धी महामार्गावर चालकाला लागली डुलकी, भरधाव कार बॅरिअरवर धडकली
By संदीप वानखेडे | Updated: March 31, 2024 14:41 IST2024-03-31T14:41:15+5:302024-03-31T14:41:25+5:30
समृद्धी महामार्गावर एकाच कुटुंबातील पाचजण जखमी. वाहन चालवताना वाहन चालकांनी पुरेशी झोप घेऊनच वाहन चालवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

समृद्धी महामार्गावर चालकाला लागली डुलकी, भरधाव कार बॅरिअरवर धडकली
दुसरबीड : चालकाला डुलकी लागल्याने भरधाव कार समृद्धी महामार्गावरील सिमेंटच्या बॅरिअरवर धडकली. यामध्ये एकाच कुटुंबातील पाचजण किरकाेळ जखमी झाले. ही घटना समृद्धी महामार्गावर ३० मार्च राेजी घडली.
हिंगाेली येथील लक्ष्मीकांत अशोक सारडा हे कार क्रमांक एमएच ३८ व्ही ७२८८ ने इगतपुरी येथून हिंगाेलीकडे जात हाेते. दरम्यान समृद्धी महामार्गावर चॅनल ३०२ वर सारडा यांना डुलकी लागली. त्यामुळे भरधाव कार समृद्धी महामार्गाच्या लगत असलेल्या सिमेंटच्या बॅरिकेटवर आदळली. यामध्ये त्यांच्यासह भाग्यश्री लक्ष्मीकांत सारडा वय ३० वर्ष, विनय सुनील मुंदडा वय ३२ वर्ष, विजय मुंदडा वय ३६ वर्ष, आरती विनय मुंदडा सर्व रा. हिंगोली हे किरकोळ जखमी झाले.
अपघातस्थळी महामार्ग पोलिस सहायक पोलिस निरीक्षक संदीप इंगळे, पीएसआय राजू गायकी, पोलिस हेडकॉन्स्टेबल विठ्ठल काळुसे, पोकाॅ. निवृत्ती सानप व महाराष्ट्र सुरक्षा बलचे प्रमुख भगवान गायकवाड व जवान दत्ता जोशी, सचिन नाईक व क्यूआरव्हीचे जवान तत्काळ हजर होऊन अपघातग्रस्तांना मदत केली. वाहतूक सुरळीत करण्यात आली. तसेच महामार्ग पोलिस मलकापूर यांच्याकडून दररोज वाहन चालक यांना वाहतूक नियमाबद्दल प्रबोधन करण्यात येते व वाहन चालवताना वाहन चालकांनी पुरेशी झोप घेऊनच वाहन चालवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.