दुचाकी रस्त्याच्या संरक्षक कठच्यावर आदळली, छ. संभाजीनगर जिल्ह्यातील एक जण ठार, दोघे गंभीर
By निलेश जोशी | Updated: December 16, 2023 20:29 IST2023-12-16T20:28:50+5:302023-12-16T20:29:27+5:30
हा अपघात १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडला.

दुचाकी रस्त्याच्या संरक्षक कठच्यावर आदळली, छ. संभाजीनगर जिल्ह्यातील एक जण ठार, दोघे गंभीर
धाड : येथील बायपास मार्गावर राजर्षी शाहू महाविद्यालयाजवळ झालेल्या दुचाकी अपघातामध्ये एकजण ठार झाला, तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना छत्रपती संभाजीनगर येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. हा अपघात १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडला.
बुलढाण्याकडून करडीकडे जात असताना बायपासवरील एका वळणावर लावण्यात आलेल्या लोखंडी संरक्षक कठड्यावर ही दुचाकी धडकल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मृतक व जखमी हे छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद तालुक्यातील ताजनापूर येथील रहिवासी आहेत. बुलढाणा येथून ते गावाकडे एमएच २०- जीएल ६१८८ क्रमांकाच्या दुचाकीने जात असताना बायपासवरील एका वळणावर हा अपघात झाला. स्थानिक नागरिकांना त्याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविले. दरम्यान, जखमींपैकी अनिकेत गणेश काळे (२६) याचा मृत्यू झाल्याची माहिती बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील सूत्रांनी दिली. गणेश रामा काळे (२४) आणि आकाश सुधाकर काळे (२५) हे दोघे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना छ. संभाजीनगर येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या अपघाताची धाड पोलिसांनी नोंद घेतली असून, पोलिस पुढील तपास करीत आहेत.