स्वयंपाकाची चव महागली; मसाला दरांत दुप्पट वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:39 IST2021-08-20T04:39:50+5:302021-08-20T04:39:50+5:30
तोंडाची चव वाढविणारे आणि आयुर्वेदिकदृष्ट्या शरीराला गरजेचे असलेल्या मसाल्याच्या दरात अवघ्या मागील काही दिवसांत दुपटीने वाढ झाली आहे. रामपत्री ...

स्वयंपाकाची चव महागली; मसाला दरांत दुप्पट वाढ
तोंडाची चव वाढविणारे आणि आयुर्वेदिकदृष्ट्या शरीराला गरजेचे असलेल्या मसाल्याच्या दरात अवघ्या मागील काही दिवसांत दुपटीने वाढ झाली आहे. रामपत्री ८०० रुपयांहून १००० वर जाऊन पोहोचली आहे. बदामफूल, जिरे, लवंग, काळी मिरी आणि इतर मसाल्याच्या पदार्थांच्या दरामध्ये विक्रमी वाढ झाली असून, आता मसाला खरेदी करावा की नाही असाही प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे, तर चटणीमध्ये वापरल्या जाणाऱ्या रामपत्री, तमालपत्री, जायपत्री यांचे दर दुपटीने वाढले आहेत. हे वाढते तर सर्वसामान्यांच्या रुचकर जेवणांमध्ये व्यत्यय आणत आहेत एवढे मात्र खरे.
याचसोबतच काजू, बदाम हे श्रीमंतांचे खाणे मानले जात असले, तरी कोरोनाच्या महामारीमुळे मध्यमवर्गीयांच्या घरातही हे पदार्थ आवर्जून वापरले जात आहेत. यातच श्रावण महिन्यात असलेल्या सण, उपवासाच्या निमित्ताने याचा वापर वाढला आहे. नेमक्या याच स्थितीत बाजारातील या खाद्यपदार्थांचे दर भडकले आहेत.
१) असे वाढले दर
मसाला जुने दर नवीन दर
रामपत्री ८०० १०००
वेलची २५०० ५०००
काळी मिरी ८०० १०००
जिरे २०० २००
नाकेश्वरी १८०० २०००
लवंग ८०० १०००
जायपत्री १२५० १८००
महागाई पाठ सोडेना !
आधी खाद्यतेल महागले, नंतर साखर महागली, वाहनांतील इंधन वाढत असतानाच आता सिलिंडरचे दरही वाढले. या सगळ्या वस्तू चढ्या भावात खरेदी करीत असतानाच आता मसाल्याच्या पदार्थांमध्ये वाढ होत आहे. एकूण सर्वसामान्यांचे बजेट यामुळे कोलमडून जात आहेत.
-किरण पाचपवार, गृहिणी.
स्वयंपाकाला जे लागते, त्या वस्तू खरेदी कराव्याच लागतात. महागाईची झळ बसत आहे. मात्र, रुचकर जेवणात या वस्तूंची गरजच आहे. पुढील काही दिवसांत या वस्तूंचे दर कमी झाल्यास दिलासा मिळेल.
- लता सोनुने, गृहिणी.
मसाल्याच्या दरात एकदमच वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा हा विपरीत परिणाम असून, याचा स्थानिक बाजारपेठेतील लहान व्यावसायिकांना दंड सोसावा लागत आहे. पुढील काही दिवसांत मसाल्याचे दर स्थिर होण्याची शक्यता आहे.
-शेख समीर, मसाला व्यावसायिक.
बाहेर राज्य आणि देशातून आयात होणाऱ्या मसाल्याची वस्तूंची आवक काही प्रमाणात घटली आहे. यामुळे स्थानिक बाजारपेठेत आवश्यक तेवढा माल उपलब्ध नसल्यामुळे विक्रीवर मोठा परिणाम होत आहे. ज्या मोठ्या व्यावसायिकांकडे या वस्तूंचा साठा आहे, ते हा माल चढ्या भावाने विकत आहेत.
-शेख इरफान, मसाला व्यावसायिक.