कृषी सिंचन साहित्य वाटप घोटाळ्यात तालुका कृषी अधिकारी जाळ्यात, कधीही अटक होण्याची शक्यता

By संदीप वानखेडे | Published: November 8, 2023 05:16 PM2023-11-08T17:16:35+5:302023-11-08T17:17:35+5:30

या प्रकरणात तालुका कृषी अधिकारी व अन्य एका अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

Taluka Agriculture Officer in the net in Agriculture Irrigation Material Distribution Scam; Chances of being arrested by the police at any time | कृषी सिंचन साहित्य वाटप घोटाळ्यात तालुका कृषी अधिकारी जाळ्यात, कधीही अटक होण्याची शक्यता

कृषी सिंचन साहित्य वाटप घोटाळ्यात तालुका कृषी अधिकारी जाळ्यात, कधीही अटक होण्याची शक्यता

सिंदखेडराजा : तालुक्यातील कृषी सिंचन साहित्य घोटाळाप्रकरणी एक वर्षापूर्वी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाची व्याप्ती वाढल्याने मंगळवारी सायंकाळी या प्रकरणात तालुका कृषी अधिकारी व अन्य एका अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वाटप केले जाणारे ठिबक व तुषार संच वाटपात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाली होती. सिंचन संच वाटप केल्याचे दाखवून तशा प्रकारचे प्रमाणपत्र विक्रेत्याला देण्यात आले होते. जवळपास १७० पेक्षा जास्त लाभार्थ्यांना जवळपास अडीच कोटी रुपयांचे प्रस्ताव यास समाविष्ट आहेत. आर्थिक लाभासाठी कृषी अधिकारी व विक्रेते यांच्या संगनमताने हा कृषी घोटाळा झाल्याचे कृषी खात्यांतर्गत झालेल्या चौकशीत निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी मोठी चर्चा झाली, वरिष्ठ स्तरावर चौकशी झाल्यानंतर, सिंचन साहित्य विक्रेते व स्थानिक कृषी विभागाचे अधिकारी यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या चांगलाच कलगीतुरा रंगला होता. प्रकरण हातचे नसल्याने. पुढील काही महिन्यांत या प्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात कृषी विभाग कर्मचारी व एका व्यावसायिकावर १५ सप्टेंबर २०२२ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला. यात कृषी साहित्य विक्रेते सुरेश लक्ष्मण चव्हाण, सिंदखेडराजा, कृषी पर्यवेक्षक चंदा नवले, गजानन चोथे व सचिन निंबाळकर यांच्या समावेश होता.

फिर्यादी झाले आरोपी

या प्रकरणाची व्याप्ती ही सप्टेंबर २०२२ मध्ये ३६ लाख रुपयांपर्यंत होती. दरम्यान यात पुन्हा ४१ लाख रुपयांची वाढ होऊन हा घोटाळ्याचा आकडा ७७ लाख रुपयांपेक्षा जास्त गेला. पूर्वी या प्रकरणात फिर्याद असलेले तालुका कृषी अधिकारी वसंत राठोड हेच नव्याने या अपहारात गुंतले असल्याचे निष्पन्न झाल्याने मंगळवारी (दि.७ नोव्हेंबर) सायंकाळी पोलिसांनी वसंत राठोड व अन्य एक अधिकारी गोपाळ बोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी तपासांत अनेकांचे नोंदविले जबाब

वर्ष उलटून गेल्यावर या कृषी घोटाळ्याप्रकरणी दोन आरोपींची वाढ झाली आहे. तालुका कृषी अधिकारी यात अडकल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी वर्षभरात जवळपास ३० ते ४० लोकांचे जबाब नोंदविले. यात लाभार्थी शेतकरी, मान्यताप्राप्त कृषी साहित्य विक्रेते व काही कर्मचारी यांचा समावेश होता. तपासांत बऱ्याच गोष्टी निष्पन्न झाल्याने या प्रकरणात राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा बेलेबल नसल्याने या प्रकरणी तालुका कृषी अधिकारी यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे़.

Web Title: Taluka Agriculture Officer in the net in Agriculture Irrigation Material Distribution Scam; Chances of being arrested by the police at any time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.