घटस्फोटासाठी गेलेल्या नातेवाइकांना बेदम मारहाण
By Admin | Updated: January 28, 2016 23:25 IST2016-01-28T23:23:40+5:302016-01-28T23:25:21+5:30
ग्रामस्थांनी मध्यस्थी करीत सोडविले; जखमींना रुग्णालयात दाखल केले.

घटस्फोटासाठी गेलेल्या नातेवाइकांना बेदम मारहाण
धामणगाव धाड (जि. बुलडाणा) : येथील एक कुटुंब जळगाव खान्देश येथे घटस्फोट घेण्यासाठी गेले असता मुलीकडील मंडळींनी गाडी अडवून त्यांना बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी जळगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यासंदर्भात माहिती अशी की, धामणगाव (धाड) येथील विष्णूपंत पायघन यांचा मुलगा पवन याचा विवाह जळगाव येथील ज्ञानेश्वर फुसे यांचे मुलीशी झाला होता; परंतु दोघांतील मतभेदामुळे घटस्फोट घेण्याचे ठरले होते, त्यानुषंगाने मुलीला साडेदहा लाख रुपये देण्याचे ठरले. पैकी पाच लाख अगोदर आणि उर्वरित साडेपाच लाख बुधवारी दिल्याचे मुलाचे मामा महेंद्र बेराड यांनी सांगितले. बुधवारी घटस्फोटाचे कामकाज आटोपून पायघन कुटुंबीय परतीच्या मार्गाने गावाकडे येत असताना जळगाव-अजिंठा महामार्गावर चिंचोली गावानजीक मुलीचा भाऊ विकी फुसे यांच्यासह पंधरा जणांनी गाडी अडवून बेदम मारहाण केली. ग्रामस्थांनी मध्यस्थी करीत सोडविले. जखमींना रुग्णालयात दाखल केले.