बुलडाणा जिल्ह्यातील ९ पालिकांमध्ये विषय समिती सभापती निवडणूक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 14:43 IST2018-12-28T14:43:32+5:302018-12-28T14:43:55+5:30
खामगाव: बुलडाणा जिल्ह्यातील १३ पैकी ९ नगर पालिकांच्या विषय समिती सभापतींचा कार्यकाळ येत्या ५ जानेवारी रोजी संपुष्टात येत आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील ९ पालिकांमध्ये विषय समिती सभापती निवडणूक!
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: बुलडाणा जिल्ह्यातील १३ पैकी ९ नगर पालिकांच्या विषय समिती सभापतींचा कार्यकाळ येत्या ५ जानेवारी रोजी संपुष्टात येत आहे. त्याअनुषंगाने ५ जानेवारी २०१९ रोजी बुलडाणा आणि खामगावसह ९ पालिकांमध्ये विषय समिती सभापती निवडीसाठी विशेष सभा पार पडणार असल्याचे संकेत आहेत.
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ६३ (२) अन्वये जिल्ह्यातील ९ पालिकांच्या विषय समित्यांच्या नेमणुकीसाठी सभा आयोजित करण्यात येणार असल्याचे समजते. यामध्ये स्थायी व विषय समिती सदस्य तथा सभापती पदाकरिता नामनिर्देशन पत्र सकाळी ११ वाजता दाखल करण्यात येतील. दोन तासांनी अर्जाच्या छाननी केली जाईल. वैध अर्जानंतर उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर आवश्यकता भासल्यास त्या पालिकांमध्ये निवडणूक प्रकीया पार पडेल.
चौकट...
या पालिकांमध्ये होईल विशेष सभा!
जिल्ह्यातील बुलडाणा, खामगाव या पालिकांसह मलकापूर, जळगाव जामोद, नांदुरा, शेगाव, मेहकर, चिखली, देऊळगाव राजा या पालिकांमध्ये विषय समिती सभापती निवडीसाठी विशेष सभा होईल. तर लोणार आणि सिंदखेड राजा या नगर पालिका आणि मोताळा, संग्रामपूर या नगर पंचायतीमध्ये ही प्रक्रीया होणार नसल्याचे समजते.
राजकीय हालचाली वाढल्या!
विषय समिती सभापती निवड सभेच्या पार्श्वभूमीवर खामगाव, बुलडाणा पालिकांसह तब्बल ९ पालिकांमधील राजकीय हालचाली वाढल्या आहेत. विषय समिती सभापती पदाची महत्वाकांक्षा असलेले नगरसेवक पक्ष श्रेष्ठींची मर्जी संपादनासाठी प्रयत्नरत असल्याचे दिसून येते. तर काही पालिकांमधील सभापती आपले पद कायम ठेवण्यासाठी कोणतीही संधी सोडताना दिसत नाही.