बॅंक खात्याच्या अटीमुळे विद्यार्थ्यांची दमछाक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 12:09 IST2021-01-10T12:07:09+5:302021-01-10T12:09:12+5:30
Khamgaon News दहावी परीक्षेचा फॉर्म ऑनलाइन भरून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना बँकेचे खाते उघडणे अनिवार्य आहे.

बॅंक खात्याच्या अटीमुळे विद्यार्थ्यांची दमछाक!
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : दहावी परीक्षेचा फॉर्म ऑनलाइन भरून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना बँकेचे खाते उघडणे अनिवार्य आहे. बँकेत खाते उघडण्यासाठी विद्यार्थी गेले असता त्यांना पॅन किंवा पॅनकार्ड रजिस्ट्रेशन, स्लिप कार्ड अनिवार्य असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांची दमछाक होत आहे. ही अट काढून टाकावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
विद्यार्थ्यांना बँकेत खाते उघडण्यासाठी आधी पॅनकार्ड काढून खाते उघडावे लागते. पॅनकार्ड मिळवण्यासाठी १५ दिवसांपर्यंत कालावधी लागतो. तसेच शाळेला शिक्षण विभागाकडून ११ तारखेपर्यंत फॉर्म भरून घेण्याचा आदेश असल्याने तशा सूचना विद्यार्थ्यांना दिल्या गेल्या आहेत. एकंदरीत या परिस्थितीमुळे दहावी व बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. पॅनकार्ड काढून बँकेत खाते उघडण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांची मोठी दमछाक होताना दिसून येत आहे. खाते उघडण्यातच परीक्षा फॉर्म भरण्याची तारीख निघून जाऊ नये, अशी धास्ती विद्यार्थ्यांना आहे. बँक खाते उघडण्याची अट रद्द करावी, अशी मागणी होत आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन परीक्षा फॉर्म भरून घ्यावे, अशा सूचना आल्यामुळे विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून घेत आहोत परंतु, बँक खाते उघडण्यासाठी पॅनकार्डची मागणी होत असल्याने विलंब होतोय.अडचण वरिष्ठांना कळवू.
- गजानन गायकवाड,
गटशिक्षणाधिकारी, खामगाव