बळकट होतेयं लोकशहीची भिंत; सामान्यांचाही प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 18:00 IST2019-03-30T18:00:22+5:302019-03-30T18:00:39+5:30
लोकशाहीच्या भिंतीचा उपक्रम नाविन्यपूर्ण ठरला असून मतदान विषयक संदेश नोंदविण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये येणा-या सर्व समान्यांचा सुध्दा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

बळकट होतेयं लोकशहीची भिंत; सामान्यांचाही प्रतिसाद
बुलडाणा: आगामी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या व्यापक मतदार जाणीव जागृतीसाठी लोकशाहीच्या भिंतीचा उपक्रम नाविन्यपूर्ण ठरला असून मतदान विषयक संदेश नोंदविण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये येणा-या सर्व समान्यांचा सुध्दा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
लोकशाहीचा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासनाने यावेळी धडाडीची मोहीम हाती घेतली आहे. दिव्यांग, महिला, जेष्ठ नागरिक, नव मतदार या विशेष घटकांसोबतच सर्वसामान्य मतदारांना सुध्दा मतदान प्रक्रीयेत सहभागी व्हावे, यासाठी प्रोत्साहीत करण्याकरीता मतदार जाणीव जागृती मोहीमेअंतर्गत व्यापक दृष्टीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांचा एक भाग म्हणून जिल्हा प्रशासनाने विविध शासकीय कार्यालये व महाविद्यालयांमध्ये लोकशाहीची भिंत उभी केली आहे. मतदारांनी या भिंतीवर मतदान विषयक संदेश देणा-या आपल्या भावना लिहून त्याखाली आपली स्वाक्षरी नोंदविणे, असे या उपक्रमाचे स्वरूप आहे.
त्याअनुषंगाने बुलडाणा जिल्हा परिषदेच्या आवारात सुध्दा ही भिंत उभारण्यात आली असून विभागीय आयुक्त डॉ. पियूषसिंग यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला होता. विभागीय आयुक्तांनी सुध्दा या भिंतीवर आपला संदेश नोंदवून मतदारांना आवाहन केले आहे. त्यानंतर आता मात्र कुतुहलापोटी सर्वसमान्यांकडून सुध्दा या भिंतीचे निरीक्षण केल्या जात असून अनेकांनी अप्रतिम अशी घोषवाक्य यावर नोंदविल्याचे दिसून येते आहे. जीवनासाठी रक्तदान, लोकशाहीसाठी मतदान अशी तुलना करतांना काही मतदारांनी मतदान हाच लोकशाहीचा पंचप्राण असल्याची भावना सुध्दा व्यक्त केली आहे.
दरम्यान, बुलडाणा लोकसभा मतदार संघासाठी येत्या १८ एप्रिलला होणा-या मतदानाच्य दिवशी सुध्दा जिल्ह्यातील मतदारांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग मिळेल यासाठी जिल्हा प्रशासनाने जोरदार उघडलेली जाणीव जागृती मोहीम यशस्वी राहील, असा विश्वास व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील सर्व घटकांनी सुध्दा या मतदार जाणीव जागृती मोहीमेत आपले योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. निरूपमा डांगे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस. यांनी केले आहे.