देऊळघाट येथे वादळी पावसाचे तांडव!

By Admin | Updated: June 7, 2017 00:34 IST2017-06-07T00:34:32+5:302017-06-07T00:34:32+5:30

अनेक घरांची पत्रे उडाली : २० घरे उद्ध्वस्त, ७ जण जखमी

Storm rainy ordeal at Deulgighat! | देऊळघाट येथे वादळी पावसाचे तांडव!

देऊळघाट येथे वादळी पावसाचे तांडव!

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: वादळी वाऱ्यासह सोमवारी रात्री आलेल्या पावसाने तालुक्यातील देऊळघाट येथे थैमान घातले असून, यामध्ये २०० पेक्षा अधिक घरांची पत्रे उडाली तर २० घर उद्ध्वस्त झाले. पत्रे लागल्याने ७ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
५ जूनच्या रात्री ९.१५ च्या सुमारास देऊळघाट परिसरात जोरदार विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. त्यातच वादळी वारा सुटल्याने भरपावसात अनेक घरांची पत्रे उडून गेली. संपूर्ण गावात एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या वादळी वाऱ्याने अनेक झाडे कोलमडून पडली व विद्युत खांब पडून तार तुटले. अर्ध्या तासानंतर पाऊस वारा थांबल्यानंतर वादळामध्ये आपआपली उडालेली पत्रे गोळा करण्यासाठी लोकांनी धावपळ केली. उमाळा रोडवरील नवीन वस्तीत राहणारे नसीरोद्दीन काझी यांच्या घरावरील वादळामुळे पत्राचे छत खाली कोसळल्याने त्यांचा पूर्ण परिवार या छताखाली दबला होता. याची माहिती मिळताच सरपंच आरिफ खान, रसुल खान व इतर ग्रामस्थ त्याठिकाणी पोहोचले व सर्व जखमींना तत्काळ सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या वादळी वाऱ्यात एकूण ७ जण जखमी झाले असून, त्यात नसिरोद्दीन काझी, मुजाहिद नसीरोद्दीन काझी, जावेद नसीरोद्दीन काझी, फातीमा नसीरोद्दीन काझी, शकीला बी नसीरोद्दीन काझी, फरजाना बी शे.जाबीर व शे.रिजवान शे.अब्बास यांचा समावेश होता. ६ जून रोजी सकाळी बुलडाणा तहसीलदार सुरेश बगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी बी. बी. महामुनी, बुलडाणा पंचायत समिती गट विकास अधिकारी चंदनसिंग राजपुत, बुलडाणा ग्रामीणचे ठाणेदार सुनिल जाधव यांनी गावात भेट दिली व चक्रीवादळाने उद्ध्वस्त झालेल्या घर मालकांना जाऊन भेटले व त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासोबत सरपंच आरीफ खान, ग्रा.पं.सदस्य गजनफर खान, सखाराम पाटील उपस्थित होते.

नुकसानाचा पंचनामा सुरु
मंगळवारी सकाळी ७ वाजतापासून महसूल विभागाचे मंडळ अधिकारी गणेश राऊत, तलाठी विजय सावळे, विनोद कोळसे, आर.बी.काकडे व ग्रामसेवक संजय बाजड यांनी गावात फिरुन नुकसानाचा पंचनामा केला. २३५ घरांचे टिन चक्रीवादळाने उडाल्याचे समोर आले असून, १५ ते २० घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. चक्रीवादळामुळे देऊळघाट परिसरात असलेले शेतातील अनेक गोठेसुद्धा उद्ध्वस्त झाले आहेत व त्यात ठेवलेला बी-बियाणे, शेती साहित्य बिनकामी झाले आहे. चक्रीवादळामुळे वीज वितरण कंपनीचेसुद्धा फार मोठे नुकसान झाले आहे. देऊळघाट परिसरात अनेक ठिकाणी वीज खांब व तार तुटून पडलेल्या अवस्थेत आहे.

Web Title: Storm rainy ordeal at Deulgighat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.