वादळी पावसाचा जिल्ह्यात कहर

By Admin | Updated: June 8, 2017 02:36 IST2017-06-08T02:36:21+5:302017-06-08T02:36:21+5:30

चार दिवसात चौघांचा मृत्यू: १५ जखमी, ३१ गावे प्रभावित

Storm in the rainy district | वादळी पावसाचा जिल्ह्यात कहर

वादळी पावसाचा जिल्ह्यात कहर

बुलडाणा: जिल्हाभरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने १ जून रोजी हजेरी लावली. जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह सुसाट वारा आणि पावसामुळे नुकसान झाले असून, चार दिवसात चौघांचा मृत्यू झाला. तसेच १५ जण जखमी तर ३१ गावे प्रभावित झाली.
जिल्ह्यात १ जूनपासून वादळी पावसाने दमदार हजेरी लावली. १ जून ते ७ जूनच्या सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात ४४.२ मि.मी पावसाची नोंद घेण्यात आली. याची सरासरी ६.२० टक्के नोंदविण्यात आली. गत वर्षी ७ जूनपर्यंत केवळ ८.२ मि.मी पावसाची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे यंदा पडलेला पाऊस निश्चित जास्त तीव्रतेचा आहे. पावसादरम्यान पडलेल्या विजा आणि वादळामुळे मोठे नुकसान झाले.
यामुळे जिल्ह्यातील सरंबा, भालेगाव, मंगरुळ नवघरे, शेलगाव आटोळ, देऊळगाव धनगर, गिरोला, धोडप, पेडका, वळती, देऊळगाव वापसा, किनगावराजा, हिवरखेड, मोताळा, रोहिणखेड, धामणगाव बढे, ब्राम्हंदा, रोहिणखेड, पोफळी, सारोळा मारोतीसह, पिंप्रीगवळी, वरदडा, इसोली, देऊळघाट, हतेडी, पाडळी, धाड, अमडापूर, हिवराआश्रम ही ३१ गावे प्रभावित झाली. यामध्ये शाळा व घरांची पडझड, जनावरांचा मृत्यू, विद्युत खांब तुटली, झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या.
शासनाच्यावतीने जिल्ह्यात कुठेही वीज रोधक यंत्र लावण्यात आले नसून, शासनाच्या भोंगळ कारभाराची शिक्षा नागरिकांना भोगावी लागत आहेत.

घरावरील पत्रे उडाली
वीज पडून २ जून रोजी भालेगाव येथील रूक्मिणा धोंडगेचा मृत्यू झाला, तर यात तीन जखमी झाले. ३ जून रोजी लोणार तालुक्यातील देऊळगाव वापसा येथील विजय गरकळ , संतोष गरकळ व सुरेश काळे यांचा मृत्यू झाला. शेलगाव आटोळ येथे अरुण काशिनाथ बोर्डे, देऊळगाव धनगर येथे समाधान रंगनाथ खंडारे व कचरू बावसकर वीज पडून जखमी झाले. रोहिणखेड येथील महिला वादळी वाऱ्यामुळे तसेच वरदडा येथील घरावरील पत्रे पडून गोदावरी आनंदा गवई ही महिला गंभीर झाली, तर ५ जून रोजी देऊळघाट येथे वादळामुळे उडालेली पत्रे लागल्याने ७ जण जखमी झाले.

जिल्ह्यात सरासरी ४४ मिमी. पाऊस
बुलडाणा जिल्ह्यात गत तीन दिवसात सरासरी ४४ मिमी पाऊस झाला. पावसाचे प्रमाण वेगवेगळ्या तालुक्यात कमी जास्त आहे. बुलडाणा ७० मिमी, चिखली ९६, देऊळगावराजा २४, सिंदखेडराजा २७.६, लोणार ४१, मेहकर ४१, खामगाव ३०.८, शेगाव २५, मलकापूर १२, नांदुरा २३, मोताळा १८, संग्रामपूर ५७, जळगाव जा.१०९ मिमी. पाऊस झाला.

पावसामुळे पेरणीला होणार सुरुवात
गत चार दिवसात जिल्ह्यात दररोज पाऊस बरसत आहे. बुधवारी पहाटे जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. पहाटे पाच वाजतापासून तर ८ वाजेपर्यंत पाऊस सुरू होता. त्यानंतर पुन्हा रात्री दहा वाजताच्या सुमारास जिल्ह्यात रिमझिम पाऊस झाला. गत चार दिवसात जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस झाला आहे. तसेच यानंतर आणखी पाऊस येण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी पेरणीला सुरूवात करणार आहेत. अनेक शेतकऱ्यांची पेरणीपूर्व मशागत पूर्ण झाली असून, लवकरच पेरणीला प्रारंभ होणार आहे. बँकांमधून पैसे मिळत नसल्यामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांकडे बी - बियाणे खरेदी करण्याकरिता पैसे नसल्यामुळे पेरणीला विलंब होण्याची शक्यता आहे. यावर्षी लवकर आलेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे.

चार दिवसातील नुकसानाचा आलेख
मृत- ०४
जखमी - १५
जनावरांचा मृत्यू - ०८
प्रभावित घरे - २००
पूर्णत: पडलेली घरे- २०
पाच शाळांचे नुकसान
४१५ गावांमध्ये विद्युत खांब तुटली, झाडे उन्मळून पडली.

 

Web Title: Storm in the rainy district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.