५0 मीटरच्या आत खासगी वाहनांना थांबा
By Admin | Updated: September 16, 2014 18:37 IST2014-09-16T18:37:19+5:302014-09-16T18:37:19+5:30
मेहकर आगाराचे नुकसान : उच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली

५0 मीटरच्या आत खासगी वाहनांना थांबा
मेहकर : येथील बसस्थानक परिसरात ५0 मीटरच्या आत खासगी वाहने थांबत असल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली होत आहे. येथे सुरु असलेल्या अवैध वाहतुकीमुळे स्थानिक आगाराचे आर्थिक नुकसान होत आहे. आर्थिक उत्पन्नाच्या बाबतीत मेहकर आगाराची चांगली प्रगती असताना अवैध वाहतुकीमुळे आगाराच्या उत्पन्नात दररोज फटका बसत आहे. अवैध वाहतुकीवर कारवाई व्हावी, यासाठी आगार व्यवस्थापने ठाणेदाराला लेखी पत्रसुद्धा दिले आहे; मात्र पोलिस विभागाकडून अवैध वाहतुकीवर कुठलीच कारवाई करण्यात येत नाही. तालुक्यात पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध वाहतूक जोमात सुरु आहे. मेहकरवरुन रिसोड, मालेगाव, जानेफळ, चिखली लोणारसह ग्रामीण भागामध्ये काळीपिवळी, मिनीडोर, अँपे, ऑटो आदी खासगी वाहनाने मोठय़ा प्रमाणावर धावतात. स्थानिक पोलिस कर्मचार्यांना तसेच वाहतूक शाखांना यासंदर्भात जाणीव असूनही त्याकडे डोळेझाक केली जात आहे. मेहकर आगाराला अवैध वाहतुकीचे ग्रहणच लागले आहे. आगारापासून अवैध वाहने ही २00 मीटरच्या अंतरावर असली पाहिजेत, असा आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिलेला आहे; परंतु मेहकर आगारापासून सदर खासगी वाहने ५0 मीटरच्या आतच थांबतात. तर लोणार वेस, जानेफळ फाटा व पोलिस स्टेशनसमोर अवैध वाहने उभी राहत असून, प्रवासी क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांना वाहनात कोंबले जात आहे. अवैध वाहने ही, प्रवासी निवार्यासमोरच खुलेआम उभी केली जात असल्याने येथे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. त्यामुळे एस.टी.बसलासुद्धा उभे राहण्यास जागा नसते. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष असते. आगारापासून २00 मीटरच्या आत थांबणारी व प्रवासी निवार्यासमोर थांबणारी अवैध वाहने हटविण्यासंदर्भात आगार व्यवस्थापक चंद्रकांत पाथरकर यांनी जून महिन्यात पोलिस स्टेशनला लेखी पत्र दिले होते; परंतु चार महिन्यांचा कालावधी उलटूनही त्यावर कारवाई झाली नाही. पोलिसांच्या या दुर्लक्षित धोरणामुळे मात्र आगाराला मोठा तोटा सोसावा लागतो. याकडे संबंधितांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.