एसटी खचाखच भरलेली, अचानक धूर येऊ लागला, 75 व्या वर्धापनदिनी धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 20:54 IST2023-06-03T20:51:17+5:302023-06-03T20:54:17+5:30
बुलढाणा आगाराची एसटी बस क्रमांक एमएच 20 - बीएल 1938 ही आज दुपारी 4 वाजता बुलढाणा येथून अजिंठा जाण्यासाठी निघाली होती.

एसटी खचाखच भरलेली, अचानक धूर येऊ लागला, 75 व्या वर्धापनदिनी धक्कादायक घटना
बुलढाणा : एसटीचा 75 वा वर्धापन दिन आज मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. एसटी बसमधून धुर निघत असताना घाबरलेल्या प्रवाशांनी आपला जीव वाचवण्यासाठी संकटकालीन खिडकी उघडून उड्या मारल्याचे समोर आले आहे.
बुलढाणा आगाराची एसटी बस क्रमांक एमएच 20 - बीएल 1938 ही आज दुपारी 4 वाजता बुलढाणा येथून अजिंठा जाण्यासाठी निघाली होती. बसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी बसलेले होते. ही बस देऊळघाट जवळ पोहोचली असता त्यामधून अचानक मोठा धूर निघू लागला ही बाब देऊळघाट येथील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी आरडा ओरड केला व बसमधील प्रवाशांना बाहेर निघण्यासाठी संकटकालीन खिडकी उघडली. त्यामधून अनेक प्रवासी उड्या मारून बाहेर निघाले.
थोड्या वेळानंतर एसटी चालकाने पुन्हा प्रवाशांना बसमध्ये बसविले व सदर बस मार्गस्थ झाली आहे. बुलढाणा डेपो मधील अनेक बसेस नादुरुस्त आहेत. प्रवासी सेवा खंडित होऊ नये म्हणून उपलब्ध असलेली बस नाईलाजास्तव चालकांना रस्त्यावर चालवण्यासाठी दिली जात आहे. मात्र अशात जर मोठी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे.