ST category candidates to get financial assistance for UPSC! | 'एसटी' प्रवर्गातील उमेदवारांना मिळणार युपीएससीसाठी आर्थिक सहाय्य!

'एसटी' प्रवर्गातील उमेदवारांना मिळणार युपीएससीसाठी आर्थिक सहाय्य!

लाेकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) नागरी सेवा मुख्य परीक्षा व मुलाखतीची तयारी करणाऱ्या अनुसूचित जमाती मधील उमेदवारांसाठी आर्थिक सहाय्य योजना यावर्षी सुरु करण्यात आली आहे.  या योजनेअंतर्गत युपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना दरमहा १२ हजार रुपये विद्यावेतन व १४ हजार रुपये पुस्तक खरेदीसाठी देण्यात येणार आहेत. अनुसूचित जमाती मधील उमेदवारांना आर्थिक सहाय्य मिळणार असल्याने त्याला आधार झाला आहे. 
 योजनेअंतर्गत युपीएससी पुर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या २५ आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखतीची तयारी करणाऱ्या २५ अशा अनुसूचित जमातीमधील एकूण ५० उमेदवारांना ही आर्थिक मदत मिळणार आहे. सन २०२०-२१ पासून ही योजना लागू होणार आहे.  
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत या विद्यार्थ्यांची निवड करुन थेट त्यांच्या बँक खात्यात रक्कम वितरीत करण्यात येणार आहे.  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा स्पर्धा परीक्षांमध्ये अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा,  या समाजातील जास्तीत जास्त तरुणांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करावी व प्रशासकीय अधिकारी व्हावे  योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
आर्थिक सहाय्याअभावी स्पर्धा परीक्षेपासून वंचित राहणाऱ्या अनुसूचित जमातीमधील तरुणांसाठी या योजनेचा नक्कीच लाभ होईल, असा विश्वास आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी व्यक्त केला आहे.   इच्छूक पात्र विद्यार्थ्यांना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय स्तरावरुन अर्ज करता येणार आहे,  असे सहा. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, अकोला यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Web Title: ST category candidates to get financial assistance for UPSC!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.