श्री पालखीचा आगमन सोहळा, संतनगरीत अवतरला भक्तिसागर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 16:57 IST2023-07-24T16:56:30+5:302023-07-24T16:57:14+5:30
श्री गजानन वाटिकाजवळ श्रींच्या पालखी सोहळ्याला आणण्यासाठी वाटिकेतून दिंडी निघाली.

श्री पालखीचा आगमन सोहळा, संतनगरीत अवतरला भक्तिसागर
अनिल उंबरकर
शेगाव : श्रीक्षेत्र पंढरपूर वारीसाठी गेलेल्या श्री गजानन महाराज संस्थानच्या पायदळ पालखी सोहळ्याचे सोमवारी २४ जुलै रोजी सकाळी १२ वाजता शेगावी स्वगृही आगमन झाले.
श्री गजानन वाटिकाजवळ श्रींच्या पालखी सोहळ्याला आणण्यासाठी वाटिकेतून दिंडी निघाली. दोन्ही दिंड्या एकमेकांत सामावल्या. दोन्हीकडून हरिनाम, गण गण गणात बोते, ज्ञानोबा माऊली तुकाराम...चा गजर होत होता. दरम्यान, सेवाधारी व्यवस्थापकीय विश्वस्तांचे हस्ते पालखीतील श्रींच्या रजत मुखवट्याचे तसेच वीणापूजन होऊन चरणस्पर्श केले.
श्रींचा पालखी सोहळा ७२५ किमीचा प्रवास करून श्रीक्षेत्र पंढरपूर येथे २७ जून रोजी पोहोचला होता. पंढरपुरात ५ दिवसांचा मुक्काम करून ३ जुलै रोजी पालखी सोहळा परतीच्या मार्गावर निघाला. त्यानंतर पंढरपूर ते शेगाव असा ५५० किमीचा प्रवास करून २४ जुलै रोजी पहाटे खामगाव येथून प्रस्थान होऊन सकाळी १२ वाजता श्री ग.म. वाटिका येथे आगमन झाले. संतनगरीसह विदर्भातील असंख्य भाविकभक्त श्रींच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होते. दुपारी २ वाजता श्रींच्या पालखी परिक्रमेस प्रारंभ झाला. सायंकाळी ७ वाजता दरम्यान पालखी श्री मंदिरात पोहोचणार आहे.
भक्तीच्या वाटेवर गाव तुझे लागले,
दर्शन घेण्यासाठी मन माझे थांबले,
तुझ्या भक्तीचा झरा असाच वाहू दे,
गजानना मला नेहमी तुझ्या चरणाशी राहू दे....अशी विनवणी भाविकांनी श्री चरणी केली.
दोन लाखांहून अधिक भाविकांनी घेतला महाप्रसाद
श्रींच्या पालखीसोबत जवळपास अडीच लाख भाविकांनी खामगाव-शेगाव पायी वारी केली. पायी वारीत सहभागी भाविकांसाठी श्री गजानन महाराज संस्थानचे वतीने वाटिका परिसरात महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. दोन लाखांहून अधिक भाविकांनी लाभ घेतला.
आजी-आजोबांची नातीसह पायी वारी
खामगाव तालुक्यातील शेलोडी येथील अरूण मामनकार, वर्षा मामनकार हे मुलगी व एक वर्षाची नात अनुसह खामगाव-शेगाव पायी वारीत सहभागी झाले. नातीला झोप येत असल्याने रुमालाचा पाळणा करत तो हाती धरून त्यांनी पायी वारी केली.
शेगाव शहरातील पालखीमार्गावर संग्रामपूर तालुक्यातील रिंगणवाडी येथील विलास पाटील यांनी ठिकठिकाणी आकर्षक रांगोळी काढली. गेल्या १७ वर्षांपासून ते सेवा देत असून आत्मिक समाधान मिळत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.