शेतकऱ्यांनी सोयाबीन पीक वखरले!
By Admin | Updated: July 1, 2017 00:00 IST2017-07-01T00:00:39+5:302017-07-01T00:00:39+5:30
बुलडाणा : तालुक्यातील धाड परिसरात सोयाबीन पीक पिवळे पडून त्याची वाढ खुंटली असल्याने शेतकऱ्यांनी उभे सोयाबीन पीक वखरले आहे.

शेतकऱ्यांनी सोयाबीन पीक वखरले!
लोकमत न्यूज नेटवर्क
धाड : वेळेपूर्वी आणि दमदार स्वरूपात होणाऱ्या पावसाने खरीप हंगाम मार्गी लागला असून, यावर्षी पावसाअभावी होणारी दुबार पेरणी टळली आहे. मात्र, सध्या बुलडाणा तालुक्यातील धाड परिसरात सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणावर हळदीसारखे पिवळे पडून त्याची वाढ खुंटली असल्याने धाडनजीकच्या बोरखेड (धाड) या गावाच्या शेतकऱ्यांनी उभे सोयाबीन पीक वखरले आहे.
खरीप हंगामात सर्व पीक परिस्थिती चांगली असताना सोयाबीन पिकावर संक्रांत आल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. सध्या सोयाबीन मोठ्या प्रमाणावर पिवळे पडल्याने शेतकरी हैराण झाला आहे. बोरखेड (धाड) येथील गजानन रामदास जाधव यांनी दोन एकर, रामदास कोंडुबा वाघ एक हेक्टर, रामदास बावस्कर एक एकर, संजय शिंदे एक एकर, तेजराव बावस्कर एक एकर, इचारे बावस्कर दोन एकर, संदीप बावस्कर एक एकर, असे अनेक शेतकऱ्यांनी पिवळे झालेले सोयाबीन वखरून टाकले, तर इतर शेतकरी सोयाबीनवर औषधी फवारून प्रतीक्षा करीत आहेत.
शेतकऱ्यांनी सोयाबीनवर खोडमाशी व लोह कमतरेवर ट्रायझोफॉस ४० एमएल प्रती १० लीटर पाणी व फेरस सल्फेट १०० ग्रॅम प्रती १० लीटर पाणी, चुन्याचे निवळीत वापरावे व फवारणी करावी.
-सी.पी. जायभाये, कृषी शास्त्रज्ञ