Six killed by corona; 1285 positive in 24 hours | कोरोनामुळे सहा जणांचा मृत्यू; २४ तासांत १२८५ जण पॉझिटिव्ह

कोरोनामुळे सहा जणांचा मृत्यू; २४ तासांत १२८५ जण पॉझिटिव्ह


लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोना प्रतिबंधासाठी लावण्यात  आलेले कडक निर्बंध आणि संचारबंदीच्या तीन दिवसांनंतरही जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढत असून शुक्रवारच्या ११४० विक्रमी पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येनंतर शनिवारी पुन्हा १२८५ जण तपासणीत कोरोनाबाधित निघाले. दरम्यान, सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. परिणामी, जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या आता ३२८ झाली आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी ६८०३ जणांचे अहवाल शनिवारी प्राप्त झाले. त्यांपैकी ५,५१८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये एकट्या बुलडाणा तालुक्यात २५९, खामगावमध्ये ७६, शेगावमध्ये ५०, देऊळगाव राजात ६०, चिखलीत १२८, मेहकरमध्ये २०४, मलकापूरमध्ये ५१, नांदुऱ्यात ८७, लोणारमध्ये १०१, मोताळ्यात ११५, जळगाव जामोदमध्ये ६८, सिंदखेड राजामध्ये ८५ आणि संग्रामपूर तालुक्यात १ याप्रमाणे १२८५ जण कोरोनाबाधित आढळून आले.
सरीकडे बुलडाणा शहरातील जुनागाव येथील ५८ वर्षीय व्यक्ती आणि शहरातील ६५ वर्षीय महिला, साखरखेर्डा येथील ६५ वर्षीय महिला, मोताळा तालुक्यातील जयपूर येथील ५४ वर्षीय महिला, खामगाव तालुक्यातील टेंभुर्णा येथील ६९ वर्षीय पुरुष तसेच लोणार तालुक्यातील गायखेड येथील ८५ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात दहाजणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दरम्यान, शनिवारी ६८६ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. अद्यापही ४ हजार १३५ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४४ हजार ३७९ जणांनी कोरोनावर मात केली आहे; तर २ लाख ९६ हजार २१ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. सलग दोन दिवस विक्रमी कोरोना बाधित जिल्ह्यात आढळून आले आहेत.

Web Title: Six killed by corona; 1285 positive in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.