पावसाळ्यातही पाणीटंचाईचे सावट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 00:16 IST2017-07-30T00:11:53+5:302017-07-30T00:16:01+5:30

पावसाळ्यातही पाणीटंचाईचे सावट!
अशोक इंगळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा: तब्बल दोन महिने होऊनही सिंदखेडराजा तालुक्यात एकाही तलावात पाण्याचा मुबलक साठा नसल्याने पाणटंचाईचे सावट कायम आहे. आजपर्यंत फक्त ३०२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
सिंदखेडराजा तालुक्यात एकूण सात महसूल मंडळे आहेत. त्यात शेंदुर्जन, साखरखेर्डा, मलकापूर पांग्रा, दुसरबीड, किनगावराजा, सोनुशी आणि सिंदखेडराजा मंडळाचा समावेश आहे. या सात मंडळात केशव शिवणी, बुट्टा तांडा येथील विद्रुपा आणि राजेगाव ही धरणे मोठी आहेत. त्याचबरोबर हनवतखेड, हिवरा गडलिंग, साखरखेर्डा येथील महालक्ष्मी, गायखेडी, सिंदखेडराजा येथील चाँदणी तलाव, मोती तलाव यासह पाटबंधारे विभाग, सिंचन विभाग आणि जिप पाटबंधारे विभागाची पाझर तलाव आहेत. जून महिन्यात सर्वसाधारण पाऊस पडल्यानंतर कोरडी पडलेली तलावाची पातळी ५ ते १० टक्क्याने वाढली.
परंतु मधल्या काळात पावसाने दडी मारल्याने झपाट्याने पाणी पातळी घटून सर्वच तलावांनी पातळी गाठली आहे. काही तलावातून नळयोजनेला पाणीपुरवठा केला जातो. ह्या नळयोजना शेवटच्या घटका मोजत आहेत. यावर्षी शेंदुर्जन मंडळात ३९२.२ मि.मी. ही सर्वाधिक पावसाची नोंद असून, मलकापूर पांग्रा मंडळात ३४४.९ मि.मी., सोनुशी मंडळात ३०२.०४ मि.मी., किनगावराजा मंडळात २९६ मि.मी., सिंदखेडराजा मंडळात २८३.४ मि.मी., साखरखेर्डा मंडळात २६८.२ मि.मी. आणि सर्वात कमी दुसरबीड मंडळात २३२ मि.मी. पावासाची नोंद झालेली आहे. तालुक्याची पावसाची सरासरी ३०२.०७ मि.मी. असून, मागील वर्षी पेक्षा कमी आहे. जुलै महिन्यात एकदाही दमदार पाऊन न पडल्याने जलयुक्त शिवार योजनेंतर्गत बांधलेली सर्व कट्टे, बंधारे कोरडीच आहेत.