मिणमिणत्या दिव्यात तिने मिळविले ८६ टक्के गुण
By Admin | Updated: June 5, 2014 22:08 IST2014-06-05T22:08:41+5:302014-06-05T22:08:52+5:30
मनिषा सिंदखेडराजा तालुक्यात वाणिज्य शाखेत मागासवर्गीयातून प्रथम

मिणमिणत्या दिव्यात तिने मिळविले ८६ टक्के गुण
अशोक इंगळे / सिंदखेडराजा
अठरा विश्व दारिद्रय, वडीलांचे छत्र हरविले. पोटाची खळगी भरण्याची कोणतीही सोय नाही, अशा विपरीत परिस्थितीतही मिनमिनत्या दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करून मोल मजूरी करणार्या आपल्या आईचे स्वप्न पूर्ण करून साखरखेर्डा येथील एससीएस ज्युनिअर कॉलेजच्या मनिषा शिराळे हिने इयत्ता १२ वीत मिळविलेले यश हे इतरांना प्रेरणा देणारे ठरले. ८६ टक्के गुण प्राप्त केलेल्या मनिषाने वाणिज्य शाखेत तालुक्यातून अव्वल नंबर प्राप्त केला. मनिषा महादू शिराळे एक दलित चर्मकार समाजात जन्मलेली मुलगी, वर्ग १0 वीत असतांना एका लग्न समारंभातून परत येत असतांना वडीलांचा अपघाती मृत्यू झाला. मोठी बहिण १२ वी पास आणि डिएड ला जाण्याची लगबग सुरू असतानाच एका अपघाताच्या घटनेत पित्याचं छत्र हरविले आणि हे कुटुंब मानसीकदृष्ट्या कालमडून पडले.मात्र हे दु:ख बाजूला सारून या मुलींच्या पाठीशी मायेच छत्र खंबीरपणे उभं राहिल्याने, किरण व मनिषा या दोघ्या बहिणींना जगण्याचं बळ मिळालं. राहिला प्रश्न शिक्षणाचा, लहान भावाने वडीलोपार्जीत व्यवसाय हाती घेवून बस स्थानकावर बुट पॉलीशचा व्यवसाय सुरु केला. पै-पै जमा करुन बहिणीला वेळो वेळी वह्या पुस्तके घेवून दिली. एकच खोली अन कुटुंबातील चार सदस्य अशा कठीण परिस्थितीत आणि धैर्याने परिस्थितीचा सामना करीत ितने १२ वीच्या परिक्षेत वाणिज्य शाखेत चक्क ८६.३१ टक्के गुण मिळवून मागासवर्गीयातून तालुक्यात प्रथम आली. तिच्या शैक्षणिक कार्याचे सर्वत्र स्तरातून कौतुक होत आहे.