आंदोलनाचा सातवा दिवस
By Admin | Updated: July 28, 2014 00:13 IST2014-07-28T00:08:23+5:302014-07-28T00:13:25+5:30
खामगाव नगर पालिका सफाई कामगारांचा तीव्र आंदोलनाचा निर्धार.

आंदोलनाचा सातवा दिवस
खामगाव: आपल्या विविध न्याय मागण्यांसाठी २१ जुलैपासून पालिकेतील सफाई कामगारांनी बेमुदत आंदोलन छेडले आहे. शासनाकडून सातत्याने दिशाभूल होत असल्यामुळे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार सफाई कामगारांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी संघटनेने १५ जुलैपासून राज्यव्यापी संप पुकारला होता. या संपात २१ जुलै पासून सफाई कामगारही उतरले होते. दरम्यान, पालिका कर्मचारी संघटनेचा संप संपुष्टात आल्यानंतरही सफाई कामगारांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले असून आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत लढा देण्याचा सफाई कामगारांचा निर्धार आहे.
सफाई कामगारांच्या वारसांना लाड, पागे कमेटीच्या शिफारशीनुसार नियुक्ती देण्यात यावी. नगर पालिका, महापालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १ लाख सफाई कामगारांची पदे निर्माण करण्यात यावी, मेहतर समाजाला अनुसुचित जातीतील अतिमागासलेला दलित समाज म्हणून अतिरिक्त ५ टक्के आरक्षण देण्यात यावे.
राज्यातील सफाई ठेका पद्धत त्वरीत बंद करण्यात यावी, सफाई कर्मचारी आयोगाचे त्वरीत पुर्नगठन करण्यात यावे, यासह सफाई कामगारांच्या इतर विविध न्याय मागण्यांच्या पुर्ततेसाठी सफाई कामगारांनी आंदोलन छेडले आहे. या आंदोलनात अखिल भारतीय सफाई मजदूर कॉग्रेसचे शहर अध्यक्ष सुनील उज्जैनवाल, प्रदेश सचिव नारायण सारसर, उपाध्यक्ष संतोष सारसर आदींसह पालिकेचे इतर सफाई कामगार सहभागी झाले आहेत. या आंदोलनामुळे शहरातील स्वच्छतेच्या कामांवर परिणाम जाणवत आहे.