शाळांना मिळणार पाणी शुद्धीकरण यंत्र
By Admin | Updated: July 26, 2014 22:54 IST2014-07-26T22:54:20+5:302014-07-26T22:54:20+5:30
सर्वशिक्षा अभियान : जिल्ह्याला ४८७ पाणी शुद्धीकरण यंत्र प्राप्त

शाळांना मिळणार पाणी शुद्धीकरण यंत्र
खामगाव: सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शुध्द पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने पाणी शुध्दीकरण यंत्र (वॉटर फिल्टर कम प्युरीफायर) मिळणार आहेत. जिल्ह्यातील तेराही तालुक्याला एकुण ४८७ पाणी शुध्दीकरण यंत्र प्राप्त झाले असून सद्यास्थितीत शाळास्तरावर वाटप सुरू आहे. खामगाव तालुक्यात ५६ शाळांना याचा लाभ मिळणार आहे.
ह्यसारे शिकु या सारे पुढे जाऊ याह्ण या हेतूने विद्यार्थ्यांचा प्राथमिक शाळेतच सर्वांगीण विकास व्हावा तसेच शाळेच्या भौतिक सुविधा परिपूर्ण करण्याच्या दृष्टीने शासनाचा शिक्षण विभाग कार्यरत आहे. सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत सुसज्ज शाळा खोल्या, मोफत पाठय़पुस्तके, मोफत गणवेश, अल्पसंख्याक शिष्यवृत्ती तसेच प्रोत्साहन भत्ता विद्यार्थ्यांना दिला जातो. बालकांच्या मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २00९ अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची हमीच शासनाने घेतली आहे. बालवयात एकही विद्यार्थी शाळेपासून वंचीत राहू नये म्हणून शिक्षण विभाग प्रयत्नरत आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शुध्द पाणीपुरवठा व्हावा याकरीता शिक्षण विभागाकडून प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांना पाणी शुध्दीकरण यंत्र देण्यात येत आहेत. बुलडाणा जिल्ह्यात ५0 लिटर पाणी क्षमता असलेले २८0 तर २५ लिटर पाणी क्षमता असणारे २0७ जलशुध्दीकरण यंत्र मिळाले आहेत. यामध्ये खामगाव तालुक्यातील ५६ शाळांना याचा लाभ मिळणार असल्याची माहिती आहे.