Sanjay kute could get mister post | संजय कुटेंना संभाव्य विस्तारीत मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता
संजय कुटेंना संभाव्य विस्तारीत मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता

-नानासाहेब कांडलकर
 जळगाव जामोद : राज्य मंत्रिमंडळाचा १६ जूनला विस्तार होणार असून त्यामध्ये आ. डॉ. संजय कुटे यांचा समावेश असल्याचे संकेत मिळाले आहेत. शनिवारी दुपारी त्यांना राजभवनातून तसा फोन आला असून, मुंबईला शपथविधीसाठी ते रवाना झाले आहेत. शनिवार १५ रोजी दुपारी १२.१५ वा. आ. डॉ. संजय कुटे यांना राज्यपालांच्या कार्यालयातून फोन आला आणि १६ जूनला सकाळी ११ वा. मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी राजभवनात उपस्थित राहण्यासंबंधी सांगण्यात आले. विशेष म्हणजे यावेळी आ. डॉ. संजय कुटे जळगाव नगर परिषदेत नगराध्यक्ष, नगरसेवक व मुख्याधिकारी यांच्यासमवेत नगरपालिकेच्या कामकाजाविषयी व नगरातील विविध विकास कामांबाबत चर्चा करीत होते.

फोन आल्यानंतर त्यांना चर्चा आटोपती घेत ते निवासस्थानी पोहचले आणि ही सुखद बातमी वा-यासारखी पसरताच त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी व स्नेहीजनांनी शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी केली. सर्वांच्या शुभेच्छांचा स्विकार करीत आ.कुटे हे मुख्यमंत्र्यांनी १५ जूनला रात्री १० वा. वर्षा बंगल्यावर बोलाविलेल्या बैठकीसाठी दुपारी २.३० वाजता जळगाव जामोदवरून औरंगाबाद व तेथून विमानाने मुंबईकरीता रवाना झाले. जनतेच्या आशिर्वादामुळेच मंत्रीपद स्वातंत्र्य प्राप्तीनंतर जळगाव जामोद मतदार संघाला प्रथमच मंत्रीपदाचा मान मिळत आहे. याबद्दल त्यांची भावना जाणून घेतली असता ते म्हणाले. जनतेच्या आशिर्वादानेच मला हा सन्मान मिळाला आहे. बुलडाणा जिल्ह्याच्या विकासासाठी मी आणखी प्रयत्न करेल.

जळगाव मतदार संघातील जनतेने माझ्यावर जे प्रेम केले त्याचेच हे फलीत आहे. भाऊसाहेबांच्या आठवणीने आ.कुटे गहिवरले स्व.भाऊसाहेब फुंडकर यांनी मला राजकीय जीवनात आणले. परंतु आज ते नाहीत. त्यांचे नसणे हे माझ्यासाठी वेदनाकारी आहे. असे म्हणत आ.डॉ.संजय कुटे यांचे डोळे पाणावले. क्षणभर थांबुन डोळे पुसत त्यांनी मला मिळालेल्या या संधीचा महाराष्ट्रातील जनतेसाठी उपयोग करून घेईल, असे नम्रपणे सांगितले. यावेळी त्यांचे पिताश्री श्रीरामजी कुटे व धर्मपत्नी डॉ.अपर्णाताई कुटे व मुलगा शंतनु व अभिषेक यांनी ही आपल्या भावना व्यक्त केल्या. आई उमाताई शिर्डी येथे साईबाबांच्या चरणी आ.डॉ.संजय कुटे यांच्या मातोश्री उमाताई कुटे या शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी गेल्या आहेत. विशेष म्हणजे शनिवारी त्या साईबाबांच्या मंदिरात असतानाच त्यांना आपला मुलगा हा मंत्री झाल्याची गोड बातमी कळाली. आणि त्यांनी साई बाबा चरणी संकल्प पूर्ण झाल्याचा विडा ठेवला. वैद्यकीय व्यावसायिक ते मंत्री नगरातील माळीखेलमध्ये वैद्यकीय व्यवसायाला डॉ.संजय कुटे यांनी सुरूवात केली.

गुरूकुंज (मोझरी) जि.अमरावती येथे त्यांनी बी.ए.एम.एस. ची पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर नगरातील माळीखेल भागात आपल्या वैद्यकीय व्यवसायाला सुरूवात केली हे करीत असतानाच त्या ‘प्रोपर्टी’मध्ये उडी घेतली आहे. शेती खरेदी करून प्लॉटिंगचा व्यवसाय सुरू केला. त्यामध्ये त्यांनी चांगले यश मिळाल्यानंतर त्यांच्या राजकीय आकांक्षा पल्लवीत झाल्या आणि ते प्रथमच भाजपाचे तालुका अध्यक्ष बनले. त्यानंतर सन २००४ च्या विधानसभा निवडणुकीत भाऊसाहेब फुंडकरांच्या माध्यमातून तिकीट मिळवून ते प्रथम आमदार झालेत. त्यानंतर त्यांचा राजकीय आलेख चढतच गेला आणि थेट मंत्रीपदापर्यंत पोहोचले.


Web Title: Sanjay kute could get mister post
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.