कारची काच फोडून शिक्षकाचे ९ लाख रुपये पळविले; देऊळगाव माळी येथील घटना
By निलेश जोशी | Updated: February 16, 2024 19:26 IST2024-02-16T19:26:29+5:302024-02-16T19:26:49+5:30
याप्रकरणी मेहकर पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

कारची काच फोडून शिक्षकाचे ९ लाख रुपये पळविले; देऊळगाव माळी येथील घटना
मेहकर/हिवरा आश्रम (बुलढाणा): वैयक्तिक कामासाठी बँकेतून काढलेली एका शिक्षकाची ९ लाख रुपयांची रोख रक्कम दुचाकीवर आलेल्या दोघांनी कारची काच फोडून पळविल्याची घटना मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथे शुक्रवारी दुपारी घडली. दरम्यान याप्रकरणी मेहकर पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत. मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथील शिक्षक संतोष मदनलाल लद्धड यांनी वैयक्तिक कामासाठी मेहकर येथील बँकेतून ९ लाख रुपये काढले होते.
देऊळगाव माळी मार्गे हिवरखेड येथील आपल्या शाळेवर ते कारद्वारे (एमएच-२८-व्ही-४९०१) जात होते. दरम्यान सखाराम बळी व विश्वनाथ मगर या शिक्षकांचा त्यांना चहा घेण्यासाठी फोन आला असता देऊळगाव माळी येथे त्यांनी बसस्थानकाजवळ कार लावत ते चहा घेण्यासाठी गेले. तेवढ्यात त्यांच्या कारचा पाठलाग करणाऱ्या दुचाकीवर आलेल्यांनी त्यांच्या कारची काच फोडून गाडीत ठेवलेली ९ लाख रुपयांची पिशवी घेऊन पलायन केले. स्थानिकांनी त्याची माहिती त्यांना त्वरित दिले. मात्र तोवर चोरट्यांनी पलायन केले होते. याची माहिती पोलिस पाटील गजानन चाळगे यांनी मेहकर पोलिसांना दिली. त्यानंतर प्रदीप पाटील, मेहकरचे ठाणेदार राजेश शिंगटे यांनी घटनास्थळ गाठून परिसरातील सीसीटिव्ही फुटेज चेक केले. तेव्हा चोरटे त्या कैद झाल्याचे समोर आले. चोरटे काळे कपडे परिधान करून आल्याचेही समोर आले. मेहकर येथील स्टेट बँकेच्या परिसरातीलही सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आहे. वृत्त लिहीपर्यंत या प्रकरणी मेहकर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.