रोहयोच्या कामात जेसीबीचा वापर!
By Admin | Updated: January 7, 2017 20:55 IST2017-01-07T20:55:31+5:302017-01-07T20:55:31+5:30
मजुरांना कामाची प्रतीक्षा कायम; नियमांना डावलून रोहयोची कामे.

रोहयोच्या कामात जेसीबीचा वापर!
बुलडाणा, दि. ७- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात अनेक ठिकाणी विविध कामे सुरू आहेत. परंतू या कामामध्ये रोजगरांचे वेतन काढून जेसीबीचा वापर केला जात असल्याचे वास्तव मेहकर तालुक्यातील ऊमरा, लोणी व पांगरखेड येथे सुरू असलेल्या रोहयोच्या कामातून समोर आले आहे. काही ठिकाणी रोहयोची कामे नियमांना डावलून होत असल्याने मजुरांना कामाची प्रतीक्षाच करावी लागत आहे.
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी अधिनियम १९७७ नुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागात अकुशल व्यक्तींकरिता रोजगार हमी योजना व वैयक्तीक लाभाच्या योजनांची अंमलबजावणी सुरू आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना ते वास्तव करतात त्या ठिकाणी त्यांच्या हाताला काम मिळावे, असा उद्देश असतानांही सध्या रोहच्या कामांमध्ये उद्दशाला मात्र मुठमाती दिल्या जात आहे. रोहयोचे नियम धाब्यावर ठेवून ठेकेदारी पद्धतीने जिल्ह्यात सर्वत्र रोहयोची कामे सुरू आहेत. तसेच रोहयोच्या कामांचे मजूरांच्या नावावर पैसे काढून कामांमध्ये जेसीबीचा सर्रास वापर केला जात आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पांदण रस्ते व नाला खोलिकरण व रुंदीकरणाचे कामे सध्या सुरू आहेत. त्याचप्रमाणे मेहकर तालुक्यातील ऊमरा, मोळी व पांगरखेड येथे नाला खोलिकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र रोहयोच्या कामाच्या ठिकाणी मजूरांचा वापर न करता जेसीबीचा वापर करून कामे केली जात आहेत. तसेच रोहयोच्या कामात मजूर दाखवून त्यांची मजूरी काढली जाते; प्रत्यक्षात मात्र ते मजूर इतर ठिकाणीच असतात. मेहकर तालुक्यातील ऊमरा, मोळी व पांगरखेड येथे नाला खोलिकरणाच्या कामात जेसीबीचा वापर होत असल्याची तक्रार लोणी गवळी येथील संजय जागृत यांनी तहसिलदारांकडे केली आहे. यासंदर्भात तात्काळ चौकशी करून कार्यवाही करावी, अन्यथा उपोषण करण्यात येईल, असा इशाराही संजय जागृत यांच्यासह काही नागरिकांनी दिला आहे.