समृद्धी महामार्गावर लुटमार, १.६५ लाख रुपयांचा ऐवज लंपास

By संदीप वानखेडे | Updated: May 10, 2024 20:44 IST2024-05-10T20:44:26+5:302024-05-10T20:44:48+5:30

अज्ञात तीन आराेपींविरुद्ध गुन्हा : चाकूचा धाक दाखवून पळविले दागिने. 

Robbery on Samriddhi Highway, 1.65 lakh rupees looted | समृद्धी महामार्गावर लुटमार, १.६५ लाख रुपयांचा ऐवज लंपास

समृद्धी महामार्गावर लुटमार, १.६५ लाख रुपयांचा ऐवज लंपास

डोणगाव : समृद्धी महामार्गावरील पेट्रोल पंपच्या सर्व्हिस रोडवर १० मे राेजी पहाटेच्या वेळी चारचाकी वाहनात आराम करीत असलेल्या कुटुंबांना तिघांनी चाकूच्या धाकावर लुटले. चाेरट्यांनी कारमधील एक लाख ६५ हजार रुपयांचा एवज लुटून पळ काढला. याप्रकरणी डाेणगाव पाेलिसांनी दुपारी अज्ञात तीन आराेपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

समृद्धी महामार्गावर डाेणगाव जवळील पेट्रोल पंपच्या सर्व्हिस रोडवर फिर्यादी ऋषिकेश शिवाजी दुरगुळे, रा. तेरखेडा, ता. वाशी, जि. धाराशिव व त्यांचे नातवाेईक हे वाहन क्रमांक एमएच १२ जेसी १९१९ मध्ये आराम करण्यासाठी थांबले हाेते. यावेळी त्यांच्या वाहनांजवळ अज्ञात तीन जण आले. त्यांनी चाकूचा धाक दाखवून फिर्यादीच्या खिशातील दाेन हजार रुपये राेख, गाडीमध्ये असलेल्या बॅगमधील दाेन लॅपटाॅप किंमत ४० हजार, तसेच त्यांची बहीण स्नेहल यांचे २० ग्रॅमचे साेन्याचे मंगळसूत्र किंमत एक लाख व साेन्याची अंगठी किंमत १५ हजार असा १ लाख ६५ हजार रुपयांचा एवज बळजबरीने काढून पाेबारा केला. याप्रकरणी डाेणगाव पाेलिसांनी अज्ञात आराेपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पीएसआय संदीप साळवे करीत आहेत.
 

Web Title: Robbery on Samriddhi Highway, 1.65 lakh rupees looted