राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको! रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी देऊळगाव मही येथील ग्रामस्थ आक्रमक
By ब्रह्मानंद जाधव | Updated: June 11, 2023 19:36 IST2023-06-11T19:36:03+5:302023-06-11T19:36:12+5:30
रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी देऊळगाव मही येथील वार्ड क्रमांक चारमधील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला.

राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको! रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी देऊळगाव मही येथील ग्रामस्थ आक्रमक
देऊळगाव राजा (बुलढाणा) : रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी देऊळगाव मही येथील वार्ड क्रमांक चारमधील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला. अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी देऊळगाव मही येथून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावरच ११ जून रोजी रास्तारोको आंदोलन केले.
तालुक्यातील ग्रामपंचायत देऊळगाव मही अंतर्गत वार्ड क्रमांक चारमधील २५ फूटाचा सरकारी रस्ता व एक सरकारी विहीर काही लोकांनी अवैध पद्धतीने अतिक्रमण केले आहे. हा रस्ता गावाच्या रहदारीसाठी उपलब्ध आहे. या रस्त्यावर अतिक्रमण करून त्याला फ्लॉट दाखवण्याचा प्रयत्न केल्या जात असून, त्यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. गावाचा २५ फूट सरकारी रस्ता आहे, त्या पूर्व स्थितीमध्ये चालू ठेवावा, यासाठी सोलापूर-मलकापूर राष्ट्रीय महामार्गावर काँग्रेसचे नेते प्रदीप नागरे यांच्या नेतृत्वात रास्ता रोको करण्यात आला. या रास्ता रोकोमध्ये वार्ड क्रमांक चार मधील नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. जवळपास अर्धा तास रास्ता रोको झाल्याने प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली होती. रस्त्याने वाहनाच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या.