मध्यप्रदेशाला जोडणारा रस्ता धोकादायक
By Admin | Updated: September 15, 2014 00:59 IST2014-09-15T00:59:26+5:302014-09-15T00:59:26+5:30
सावधान : एकीकडून दरडीचा धोका तर दुसरीकडे दरी

मध्यप्रदेशाला जोडणारा रस्ता धोकादायक
जयदेव वानखडे / जळगाव जामोद
महाराष्ट्राला मध्यप्रदेशासोबत जोडणारा बर्हाणपूर रस्ता जळगाव जामोद तालुक्यातून जातो; मात्र मध्यप्रदेशातील रस्त्याचे काम प्रगती पथावर असून, महाराष्ट्रातील काम गत तीन वर्षांपासून रखडले आहे. शिवाय अतिशय अरुंद रस्ता आणि कोसळलेल्या दरडी तसेच खालच्या बाजूला असलेल्या खोल दर्या- खोर्यांमुळे हा रस्ता वाहतुकीसह पर्यटकांसाठीही धोकादायक ठरत आहे.
जळगाव जामोद तालुका येथून केवळ १६ किमी अंतरावर मध्यप्रदेशाची सीमा आहे आणि जळगावरून बर्हाणपूर अंतर केवळ ५८ किमी एवढे आहे. त्यामुळे या ठिकाणावरून बर्हाणपूर रस्ता व्हावा हे या भागातील लोकांची मागणी आहे; मात्र ही मागणी स्वप्नच राहते की काय, अशी स्थिती या रस्त्याची आहे. कारण हा मार्ग अतिशय निकृष्ट दर्जाचा बनलेला आहे. घाटामध्ये रस्त्यातील गिट्टी आपोआप वर आली, तर ज्या ठिकाणावरून पाण्याचा प्रवाह वाहतो त्या ठिकाणी बनवलेले सिमेंटचे धापे आणि रस्त्यांचे तुकडे उघडे पडले आहे. शिवाय सिमेंट रस्त्यासाठी टाकलेल्या लोखंडी जाळ्यावरून दिसत आहे.
हा रस्ता वनक्षेत्रातून जात असल्याने वनविभाग आपली जमीन द्यायला तयार नाही. केवळ १0 फुटाचा रस्ता घाटात खालच्या बाजूने खचत जातो. त्यामुळे अनेक ठिकाणी हा रस्ता अतिशय अरुंद आणि धोक्याचा बनला. धोक्याचा वळणावर तर खालचा भाग वाहून गेल्याने त्याला मोठमोठे खड्डे पडले आहेत. वरच्या बाजूने उंच पहाड असल्याने जास्त पाऊस झाला की मुरुमाड माती कोसळते आणि रस्ता पूर्ण जाम होतो आणि तो वर्षभर तसाच राहतो ते ढिगारे हटविण्याचे कामही सार्वजनिक बांधकाम विभाग करत नाही.
वनविभाग जागा देत नाही अशा परिस्थितीत आहे त्या स्थितीत रस्ता तयार झाला असून निधी उपलब्ध झाल्यावर त्याची देखभाल दुरुस्ती करण्यात येईल, अशी प्रतिक्रीया सा.बां.विभागाचे उ पअभियंता ढोकणे यांनी दिली.