ज्येष्ठ नागरिकांमध्ये ‘फायब्रोसिस’चा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 16:04 IST2020-12-18T16:03:55+5:302020-12-18T16:04:02+5:30
Khamgaon News पोस्ट कोविड सेंटरमध्ये दररोज ३ ते ५ रुग्ण अशा या तक्रारींना घेऊन डॉक्टरांकडे येत आहेत.

ज्येष्ठ नागरिकांमध्ये ‘फायब्रोसिस’चा धोका
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : देशात झपाट्याने वाढलेल्या कोरोना प्रादुर्भावानंतर सध्या बाधितांची संख्या कमी होताना दिसून येत आहे. मात्र याचा अर्थ कोरोना संपेल असा नाही. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या आपल्या देशात लाखोंच्या संख्येत बाधित आढळले असताना कोरोनाने लाखो लोकांचा जीवही घेतला आहे.
खामगाव तालुक्याची स्थिती बघितल्यास तालुक्यातील बाधितांची आकडेवारी दोन हजारांच्या जवळपास पोहोचली आहे. यात ३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्य:स्थितीत ५६ अॅक्टिव्ह रुग्ण खामगाव तालुक्यात आहेत, तर १८०१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र कोरोनावर मात केल्याचा अर्थ अस नाही की, रुग्ण पूर्णपणे बरा झाला आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतरही कित्येक रुग्णांना त्रास जाणवत असल्याच्या तक्रारी येत आहेत. विशेष म्हणजे यामध्ये ज्येष्ठांची संख्या जास्त असून, त्यांना श्वास घेण्यास त्रास, वारंवार दम लागणे, फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होणे, थकवा अशा समस्या दिसून येत आहेत. फुफ्फुसांच्या या समस्येला फायब्रोसिस म्हटले जाते. त्यामुळे कोरोनातून बरे झाल्यानंतर व दवाखान्यातून सुटी झाल्यानंतर धोका टळला असे नाही. उलट अशा तक्रारी वाढत असल्याने घरी आल्यानंतर अधिकच काळजी वाढत आहे. येथील पोस्ट कोविड सेंटरमध्ये दररोज ३ ते ५ रुग्ण अशा या तक्रारींना घेऊन डॉक्टरांकडे येत आहेत. त्यांना मार्गदर्शन केले जात असल्याचे डॉ. नीलेश टापरे यांनी सांगितले.
बरे झालेल्यांनाही आरोग्याच्या तक्रारी !
कोरोनातून बरे झाल्यानंतरही येथील सामान्य रुग्णालयात अशाच तक्रारींना घेऊन येत आहेत. अशात त्यांना आता घरी असताना काय काळजी व औषध घ्यावे हे सांगितले जात आहे. त्यांना औषध, फिजियोथेरपी आदी दिली जात असून, घरी काय-काय करावे हेही समजाविले जाते आहे. अशात आता त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करणे गरजेचे आहे.
कोरोनाने गरीब, श्रीमंत, ज्येष्ठ व युवा असे कुठलेच बंधन पाळलेले नाही. हा जीवघेणा आजार असून, खास करून युवावर्गाने त्याला गमतीत घेऊ नये, कोरोनामुळे ज्येष्ठांसोबतच युवांचाही किमती जीव गेला आहे. त्यामुळे उपाययोजनांचे पालन करावे.
- डॉ. नीलेश टापरे, निवासी वैद्यकीय
अधिकारी, खामगाव