कोरोनाच्या नावावर लावलेल्या निर्बंधांचा फेरविचार करा : आ. श्वेता महाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:35 AM2021-04-08T04:35:16+5:302021-04-08T04:35:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क चिखली : गेल्या वर्षभरापासून कोरोना संकटाने मानवी जीवन धोक्यात सापडले असून, या संकटासोबतच सुलतानी संकटाने नागरिक ...

Rethink the restrictions imposed on Corona's name: b. Shweta Mahale | कोरोनाच्या नावावर लावलेल्या निर्बंधांचा फेरविचार करा : आ. श्वेता महाले

कोरोनाच्या नावावर लावलेल्या निर्बंधांचा फेरविचार करा : आ. श्वेता महाले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

चिखली : गेल्या वर्षभरापासून कोरोना संकटाने मानवी जीवन धोक्यात सापडले असून, या संकटासोबतच सुलतानी संकटाने नागरिक त्रस्त आहेत. कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. त्यासाठी प्रशासनाने लॉकडाऊनसदृश निर्बंध लावल्यामुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघत असल्याने सद्य:स्थितीतील निर्बंधांचा फेरविचार करून मजूर, कामगार, व्यापारी, लघु उद्योजक, गॅरेज मालक, सलून, हॉटेल व्यावसायिक या व इतर लहान-मोठ्या व्यवसायांवर अवलंबून असणाऱ्यांना दिलासा देण्याची मागणी आमदार श्वेता महाले यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या पृष्ठभूमीवर शहरातील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने ६ एप्रिल रोजी आमदार श्वेता महाले यांची भेट घेऊन लॉकडाऊनला विरोध दर्शविला. यानुषंगाने आ. महाले यांनी जिल्हाधिकारी बुलडाणा यांना पत्र लिहून यासंदर्भातील निर्बंधांचा सर्वसमावेशक फेरविचार करण्याची मागणी केली आहे. अगोदरच कोरोनाचा मार, त्यात प्रशासनाचा भार, अशी परिस्थिती नागरिकांवर उद्भवलेली आहे. लॉकडाऊन जरी केले नसले तरी लावलेले निर्बंध हे लॉकडाऊनचीच आठवण करून देणारे आहेत. शनिवार, रविवार या दोन दिवसांचा लॉकडाऊन नागरिक सहन करू शकतात; परंतु इतर पाचही दिवस लॉकडाऊनसदृश निर्बंध घालण्यात आले, त्यामुळे जनमानसात कमालीची अस्वस्थता आहे. काही ठिकाणी लोक रस्त्यावर उतरून त्याचा विरोध करीत आहेत, प्रशासनाने निर्बंध घालताना विविध क्षेत्रांचा विचार केलेला नाही. या निर्बंधांचा अनेक क्षेत्रांना मोठा फटका बसत असून, अर्थव्यवस्थाही यामुळे खिळखिळी होणार आहे. त्यामुळे रिटेलर्स, छोटे दुकानदार, छोटे हॉटेल्स, केश कर्तनालय, अशा सर्व घटकांतील व्यावसायिक बेरोजगार होणार आहेत. शिवाय वाहतूक सुरू असली तरी गॅरेज आणि स्पेअर पार्टस्‌ दुकाने मात्र बंद ठेवण्यात आल्याने वाहने नादुरुस्त झाल्यास स्पेअर पार्ट न मिळाल्याने व दुरुस्ती न झाल्याने ट्रान्सपोर्टसुद्धा बंद राहणार आहे. कोरोनाला प्रतिबंध करण्यासोबतच अर्थकारण बंद होणार नाही, तसेच हातावर पोट असणारे मजूर, कामगार, बांधकाम क्षेत्रातील बांधकाम साहित्य पुरविणारी दुकाने बंद झाल्याने बांधकाम मजुरांची उपासमार होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे, असे स्पष्ट करून आ. श्वेता महाले यांनी याबाबत जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, व्यापारी, लघु व्यावसायिक, तसेच इतर घटकांशी चर्चा करून निर्बंध लावण्याबाबत फेरविचार करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी या प्रसिद्धीपत्रकाद्वारे आ. श्वेता महाले यांनी केली आहे.

Web Title: Rethink the restrictions imposed on Corona's name: b. Shweta Mahale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.