शौचालय बांधकामाची रक्कम हडपली! 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 09:14 AM2018-08-31T09:14:25+5:302018-08-31T09:21:41+5:30

लाभार्थ्याची बनावट स्वाक्षरी करून शौचालय बांधकामाची रक्कम हडपल्याप्रकरणी कारवाईसाठी सरपंच आणि सचिवाविरोधात ग्रामसभेत एक मताने ठराव घेण्यात आला.

resolution against sarpanch and secretary in gramsabha after fraud in toilet construction grant | शौचालय बांधकामाची रक्कम हडपली! 

शौचालय बांधकामाची रक्कम हडपली! 

Next

अनिल गवई

खामगाव - लाभार्थ्याची बनावट स्वाक्षरी करून शौचालय बांधकामाची रक्कम हडपल्याप्रकरणी कारवाईसाठी सरपंच आणि सचिवाविरोधात ग्रामसभेत एक मताने ठराव घेण्यात आला. खामगाव तालुक्यातील टेंभूर्णा येथे गुरूवारी दुपारी ही ग्रामसभा पार पडली. स्वच्छ भारत अभियानातंर्गत शौचालय बांधकाम अफरातफर प्रकरणी सरपंच आणि सचिवा विरोधात ग्रामसभेत ठराव घेण्यात आल्याची टेंभूर्णा येथील राज्यातील ही एकमेव घटना असल्याची चर्चा आहे.

खामगाव तालुक्यातील टेंभूर्णा येथील लालसिंग झामसिंग सोळंके यांच्या नावे शौचालयाचे  बांधकाम न करता, टेंभूर्णा येथील सरपंच आणि सचिवांनी १२ हजार रुपये अनुदान हडपल्याचा प्रकार उघडकीस आला. तक्रारीनुसार नमुना क्रमांक १२ (आकस्मिक खर्चाचे प्रमाणक, घेतलेल्या वस्तू व त्यासाठी केलेले प्रदान यांची नोंदवही) वर सोळंके यांची स्वाक्षरी न घेता बनावट स्वाक्षरीच्या आधारे २३ मार्च रोजी सरपंच आणि सचिवांनी रक्कम हडपली. याप्रकरणी लालसिंग सोळंके यांनी २८ ऑगस्ट रोजी पंचायत समितीत तक्रार दिली. त्या तक्रारीच्या अनुषंगाने स्थळ निरिक्षक केले असता, सोळंके यांच्याकडे शौचालय आढळून आले नाही. तसेच नमुना क्रमांक १२ वर लालसिंग यांनी स्वाक्षरी केली नसल्याचे दिसून आले. दरम्यान, या गंभीर प्रकरणी ३० ऑगस्ट रोजी टेंभूर्णा येथे ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेत गावातील १४५ नागरिकांची उपस्थिती होती. या सभेत शौचालय अनुदानाचा गैरवापर केल्याप्रकरणी सरपंच रुख्माबाई काळणे, तत्कालीन सचिव शिवदे यांच्याविरोधात सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला. लालसिंग सोळंके यांची कोणतीही संमती न घेता हा प्रकार करण्यात आल्याने सोळंके यांची फसवणूक झाल्याचे सभेच्या कार्यपुस्तिका अहवालात नोंद करण्यात आली. त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई या सभेत प्रस्तावित करण्यात आली. त्यामुळे टेंभूर्णा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

शौचालय न बांधता हडपली रक्कम!

लालसिंग सोळंके यांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच याप्रकरणी तक्रार करण्यात आली. दरम्यान, शौचालय बांधकाम न करता तसेच सोळंके यांची कोणतीही पूर्व परवानगी न घेता हा प्रकार करून अनुदानाची रक्कम हडपण्यात आली.

पंचायत समितीकडून स्थळ निरिक्षण!

याप्रकरणी तक्रार प्राप्त होताच, पंचायत समिती प्रशासनाच्यावतीने स्थळ निरिक्षण करण्यात आले. यावेळी पंचनाम्यामध्ये सोळंके यांच्या घरी शौचालय नसल्याचे आढळून आले. प्रकार उघडकीस आल्यानंतर, तक्रार झाल्यानंतर सरपंच आणि सचिवांकडून सोळंके यांच्याकडे शौचालय बांधकामासाठी साहित्य टाकण्यात आले. हा प्रकार चक्क समितीच्या समोर घडला. 

सभेतून अध्यक्षांची निवड!

ग्रामसभेला सरपंच रुख्माबाई  पांडुरंग काळणे या अनुपस्थित होत्या. त्यामुळे सभेतून अध्यक्षांची निवड करण्यात आली. सभेचे अध्यक्ष बाळू मोरे होते. सचिव म्हणून ग्रामसेवक बी.जी. डाबेराव यांनी काम पाहीले. यासभेत सरपंच आणि तत्कालीन सचिव शिवदे यांच्या विरोधात सर्वानुमते ठराव संमत करण्यात आला. हा ठराव पुढील कारवाईसाठी पाठविण्यात येईल.

खर्च पावतीवरील स्वाक्षरीमध्ये तफावत!

आकस्मिक खर्च प्रमाण पावती आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे करण्यात आलेल्या तक्रारीवरील स्वाक्षरीमध्ये प्रचंड तफावत आहे. तसेच खर्च पावती लिहिणाऱ्यानेच सोळंके यांची स्वाक्षरी केल्याचे दिसून आले. त्यामुळे  शौचालय बांधकामात सरपंच आणि सचिवांनी अफरातफर केल्याच्या शंकेला वाव मिळत आहे.

शौचालयाची उभारणी न करता तसेच आपली कोणतीही पूर्व परवानगी न घेता, संरपच आणि तत्कालीन सचिवांनी अनुदानाची रक्कम हडपली. यासाठी त्यांनी बनावट स्वाक्षरी केली. त्यामुळे आपण पंचायत समितीकडे तक्रार दाखल केली.
- लालसिंग झामसिंग सोळंके, तक्रारदार, टेंभूर्णा, ता. खामगाव

लाभार्थ्यांच्या बनावट स्वाक्षरीद्वारे अनुदानाची रक्कम हडपल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. ही तक्रार प्राप्त होताच स्थळ निरिक्षक करण्यात आले. पंचनामाही करण्यात आला. गुरूवारी टेंभूर्णा येथे ग्रामसभा घेण्यात आली. यासभेत सरपंच आणि तत्कालीन सचिवाविरोधात ठराव संमत केल्याची माहिती आहे. हा ठराव प्राप्त होताच तसेच स्थळनिरिक्षण अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई केली जाईल.
- किशोर शिंदे, गटविकास अधिकारी, खामगाव.
 

Web Title: resolution against sarpanch and secretary in gramsabha after fraud in toilet construction grant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.