‘मॉन्टे कॉर्लो’ने बुडविलेल्या मुद्रांक शुल्काचा अहवाल गुलदस्त्यात!
By अनिल गवई | Updated: October 4, 2022 18:13 IST2022-10-04T18:11:53+5:302022-10-04T18:13:26+5:30
‘मॉन्टे कार्लो’ कंपनीने टेंभूर्णा शिवारात तब्बल नऊ हजार ६५७ ब्रास गौण खनिजाचे अतिरिक्त उत्खनन केले.

‘मॉन्टे कॉर्लो’ने बुडविलेल्या मुद्रांक शुल्काचा अहवाल गुलदस्त्यात!
खामगाव - रस्ते विकासक कंपनी असलेल्या ‘मॉन्टे कॉर्लो’ कंपनीने तालुक्यातील टेंभूर्णा शिवारातील ६० एकर जमिनीच्या वाणिज्यक वापर आणि मुद्रांक शुल्क बुडविल्याप्रकरणी खामगाव तहसीलदारांनी दुय्यम निबंधक श्रेणी-१ यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, तब्बल पाच महिन्यांपासून मुद्रांक शुल्कप्रकरणी कारवाई थंडबस्त्यात असतानाच निबंधक कार्यालयाकडून अद्यापपर्यंत कोणताही अहवाल सादर करण्यात आलेला नसल्याचे समोर येत आहे.
‘मॉन्टे कार्लो’ कंपनीने टेंभूर्णा शिवारात तब्बल नऊ हजार ६५७ ब्रास गौण खनिजाचे अतिरिक्त उत्खनन केले. त्यामुळे या कंपनीला गौण खनिजाच्या स्वामित्वधनापोटी ६५ लक्ष, १६ हजार ३८४ रुपयांचा भरणा करावा लागला. परवानगीशिवाय उत्खनन संबंधित कंपनीच्या अंगलट आले असतानाच टेंभूर्णा शिवारातील शेतसर्वे नं. ११४ आणि ११५ मधील ६० एकर जमिनीच्या वाणिज्यक वापर आणि मुद्रांक शुल्क बुडविल्याचाही मुद्दा ऐरणीवर आला आहे. कंपनीने शासन नियमाचा भंग करून नियमबाह्य भाडेपट्टा तयार करून शासनाचा लक्षावधी रुपयांचा मुद्रांक शुल्क बुडविल्याचे समोर येत आहे.
शासन महसुलाचे नुकसान
मुद्रांक शुल्क चुकविण्यासाठी १०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवरच भाडेपट्टा करण्यात आला. नियमबाह्य पद्धतीने करण्यात आलेल्या भाडेपट्ट्यामुळे शासन महसुलाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे याप्रकरणी चौकशीची मागणी सामाजिक कार्यकर्ते नंदू भट्टड यांनी केली आहे.