फ्रिजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट; माजी मंत्री शिंगणे यांच्या घरातील किचनला आग
By निलेश जोशी | Updated: June 18, 2025 22:39 IST2025-06-18T22:38:54+5:302025-06-18T22:39:48+5:30
अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला; जीवितहानी नाही.

फ्रिजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट; माजी मंत्री शिंगणे यांच्या घरातील किचनला आग
माजी आरोग्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या चिखली रोडवरील निवासस्थानी फ्रिजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही घटना १८ जून रोजी सायंकाळी सुमारे सात वाजता घडली. स्फोटानंतर लागलेल्या आगीने संपूर्ण किचनचे नुकसान झाले आहे. मात्र, अग्निशमन दलाच्या वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला.
स्फोट इतका जोरदार होता की, किचनमधील फ्रिजचे कॉम्प्रेसर उडाल्याने आसपासचे साहित्य जळून खाक झाले. भिंती काळवंडल्या, तर इतर वस्तूंनाही आगीची झळ बसली आहे. आगीमुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण होते. घटनेच्या वेळी डॉ. शिंगणे नागपूर येथे कामानिमित्त होते. घटनेदरम्यान घरात त्यांचे मानसपुत्र पुष्पक शिंगणे, त्यांची पत्नी व काही कर्मचारी उपस्थित होते. सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. स्फोटानंतर आगीने रौद्ररूप धारण करण्याचा धोका असतानाही पुष्पक शिंगणे यांनी प्रसंगावधान राखत घरातील गॅस सिलिंडर वेळेत बाहेर काढला, त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
घटनेची माहिती मिळताच बुलडाणा नगरपालिकेचे अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले. तत्काळ परिसरातील वीजपुरवठाही खंडित करण्यात आला. या घटनेत माजी मंत्र्यांच्या निवासस्थानातील किचनचे मोठे नुकसान झाले असले, तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही, हे सुदैव मानले जात आहे. घटनास्थळी मोठी दुर्घटना टळल्यामुळे परिसरातील नागरिकांनीही दिलासा व्यक्त केला आहे.