राष्ट्रीयीकृत बँकेअभावी हाल
By Admin | Updated: June 2, 2014 00:34 IST2014-06-02T00:34:19+5:302014-06-02T00:34:49+5:30
साखरखेर्डा येथील एकाच राष्ट्रीयीकृत बँकेवर ३४ गावांचा भार

राष्ट्रीयीकृत बँकेअभावी हाल
सिंदखेडराजा : तालुक्यातील ३४ गावांचे व्यवहार साखरखेर्डा येथील एकाच राष्ट्रीयकृत बँकवर चालत असल्याने शेतकर्यांचे हाल होत आहे. प्रत्येक कामासाठी ग्राहकांना येथे प्रतिक्षाच करावी लागत आहे. साखरखेर्डा गावची लोकसंख्या २0 हजार असून, येथे भारतीय स्टेट बँक ही एकमेव राष्ट्रीयकृत बँक आहे. या शाखेअंतर्गत मेहकर तालुक्यातील मोहखेड, गजरखेड, माळखेड, लव्हाळा, लोणी, पिंपळगाव उंडा, सिंदखेडराजा तालुक्यातील सवडद, मोहाडी, राताळी, शिंदी, पिंपळगाव सोनारा, तांदुळवाडीसह ३४ गावांचा व्यवहार या बँकेशी जुळलेला आहे. त्यामुळे ग्राहकांची नेहमीच झुंबड येथे राहते. तर गारपीटग्रस्त पाच हजार शेतकर्यांची यादी याच शाखेत येवून पडली आहे. ६ कोटी रुपये बँकेत जमा असून, काही लोकांचे खात्यात पैसेही जमा झाले नाहीत. तब्बल एक महिना झाला असून, पैसे जमा झाले की नाही याची चौकशी करण्यासाठी शेतकरी येतात तेव्हा कर्मचारी त्यांना उडवाउडवीची उत्तरे देतात. भारतीय स्टेट बँक ग्राहकांना योग्य सेवाही देत नाही आणि कर्मचारी ग्राहकांशी व्यवस्थीत बोलतही नाहीत. त्यामुळे हजारो खातेधारक वैतागले आहेत. बँक विरोधात उपोषण, तालाठोको आंदोलन करुनही वरिष्ठ अधिकारी ग्राहकांच्या मागणीला दाद देत नाहीत, असेच एकूण चित्र राष्ट्रीयकृत बँकेचे आहे.