दिल्लीच्या बॉर्डरवर रविकांत तुपकरांची तोफ धडाडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:27 IST2020-12-26T04:27:46+5:302020-12-26T04:27:46+5:30

चिखली : पंजाब, हरयाणा येथील शेतकऱ्यांनी दिल्लीकडे जाणाऱ्या पाच सीमांवर गत महिनाभरापासून आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून ...

Ravikant Tupkar's cannon fired at the Delhi border | दिल्लीच्या बॉर्डरवर रविकांत तुपकरांची तोफ धडाडली

दिल्लीच्या बॉर्डरवर रविकांत तुपकरांची तोफ धडाडली

चिखली : पंजाब, हरयाणा येथील शेतकऱ्यांनी दिल्लीकडे जाणाऱ्या पाच सीमांवर गत महिनाभरापासून आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभर आंदोलने केली; मात्र निर्णायक तोडगा न निघाल्याने दिलेल्या ईशाऱ्यानुसार ''स्वाभिमानी''चे नेते रविकांत तुपकर आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह दिल्लीच्या बॉर्डरवर धडकले. सिंघू-गाजीपूर या दोन्ही ठिकाणच्या शेतकरी आंदोलनात सहभाग नोंदवत तुपकरांची मुलुख मैदानी तोफ धडाडली.

महाराष्ट्रातील शेतकरी व नेते आंदोलनात सहभागी झाल्याने ''अब हमारी ताकद दुगणी हो गयी है, सरकार को हमारी मांग के आगे झुकनाही है...''अशा भावना आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी रविकांत तुपकरांकडे यावेळी व्यक्त केल्या. तुपकर यांच्यासह कार्यकर्ते २४ डिसेंबर रोजी सिंघू-गाजीपूर बॉर्डरवर पोहोचून आंदोलनात सहभागी झाले. आपल्या आक्रमक बाण्याची वाणी तुपकरांनी दाखवून दिली. केंद्र सरकारला खडेबोल सुनावताना रविकांत तुपकर म्हणाले की, सरकारला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. ऊसाला जसा एफआरपी आहे, तसा इतर मालाला हमीभाव का देत नाही? पायाभूत सुविधा न देता स्पर्धेत उतरवणे हे घातकी धोरण असल्याचे टीकास्त्र तुपकरांनी सरकारवर सोडले.

अन्यथा महाराष्ट्रातून शेतकऱ्यांचे जत्थे धडकतील !

केंद्र सरकारने आपल्यातील अहंकार बाजूला ठेवून चर्चा करावी. आठवडाभरात शेतकऱ्यांविरोधातील विधेयके रद्द न केल्यास महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जत्थेच्या जत्थे दिल्लीच्या पाचही सीमा ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनात धडकतील, असा इशारा रविकांत तुपकर यांनी यावेळी दिला. सद्यस्थितीत रविकांत तुपकर कार्यकर्त्यांसह ठाण मांडून आहेत. सिंधू व काजीपूर सीमांचे अंतर ५० किलोमीटर आहे.

महिनाभर महाराष्ट्रात आंदोलनांचे रान

दिल्लीतील आंदोलनाचा आवाज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाराष्ट्रात विविध आंदोलनांच्या माध्यमातून बुलंद केला. राजू शेट्टी व रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात विविध आंदोलने करण्यात आली. मलकापूरला केलेले रेल रोको आंदोलन देशभर गाजले. याशिवाय धरणे आंदोलने, रास्ता रोको, कृषी विधेयकांची होळी, अंबानींच्या कापोर्रेट कार्यालयावर काढलेल्या विविध संघटनांच्या मोर्चात स्वाभिमानीने सहभाग नोंदविला. गत महिनाभरापासून आंदोलन पेटते ठेवण्यात आले होते.

Web Title: Ravikant Tupkar's cannon fired at the Delhi border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.