बैलांच्या नांगरटी झाल्या दुर्मीळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:34 IST2021-05-10T04:34:53+5:302021-05-10T04:34:53+5:30
धामणगांव धाड : कृृृषी व्यवसायात उन्हाळी नांगरटीला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. भविष्यात चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी जमिनीतील पहिली पायरी म्हणजे ...

बैलांच्या नांगरटी झाल्या दुर्मीळ
धामणगांव धाड : कृृृषी व्यवसायात उन्हाळी नांगरटीला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. भविष्यात चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी जमिनीतील पहिली पायरी म्हणजे उन्हाळी नांगरटी. सध्या या नांगरटी अंतिम टप्प्यात आल्या असून, रोहिणी व मृग नक्षत्राच्या दृष्टीने शेतीच्या मशागती उरकल्या जात आहेत. अलीकडील काळात यांत्रिकीकरणाच्या मदतीने शेतीच्या मशागतीला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे यापूर्वी बैलांच्या मदतीने होणाऱ्या मशागती अगदी नगण्य होत चालल्या आहेत.
बैलांच्या नांगरटीला होते महत्त्व
एकेकाळी शेती, शेतकरी अन् बैल हे नाते अतूट होते. ज्याच्याकडे जास्त बैल तो शेतकरी श्रीमंत मानला जायचा. थंडी कमी झाली की ज्वारी, गहू, हरभरा, सुगी संपताच सर्वत्र जमिनीच्या नांगरटी सुरू व्हायच्या. हे काम कष्टप्राय असल्याने जमीन मालक इतर शेतकऱ्यांना नांगरणीसाठी आमंत्रण देत असत. याला 'इरजीक' म्हणत. यासाठी अनेक शेतकरी बैलजोडी घेऊन नांगरणी करीत व सायंकाळी त्याच शेतात जेवणाचा आस्वाद घेतला जाई. एकमेकांच्या शेतीकामात मदत करीत कामे पूर्ण केली जायची. बैलाच्या नांगरणीमुळे जमीन तुडवली जात नाही. शिवाय शेताच्या बांधापर्यंत मशागत होते. या नांगरामागे फिरणारे पक्षी जमिनीतील विषारी जीवाणू खातात. अशा अनेक गोष्टींमुळे बैल शेतीला फार महत्त्वाचे होते. मात्र, आता बैल शेती दुर्मीळ होत आहे.