रायपुरात डेंग्यूसदृश तापाची साथ
By Admin | Updated: September 19, 2014 00:45 IST2014-09-19T00:45:20+5:302014-09-19T00:45:20+5:30
बुलडाणा तालुक्यातील रायपूर गावात डेंग्यूसदृश तापाची साथ.

रायपुरात डेंग्यूसदृश तापाची साथ
पिंपळगाव सैलानी (बुलडाणा): बुलडाणा तालुक्यातील रायपूर गावात डेंग्यूसदृश तापाची साथ आली असून, खासगी दवाखान्यात रुग्णांची गर्दी वाढली आहे. रायपूर या गावाची लोकसंख्या १२ हजारांच्या जवळपास असून, या गावातील रस्त्यांवर पाण्याचे गटार तुंबलेली आहेत. त्यामुळे मच्छरांचे प्रमाण वाढले असून ताप, उलट्या, सर्दी खोकला यांचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात वाढले आहेत. त्यातच डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण आढळत आहेत. गावातील पीयूष अरुण जैस्वाल वय ६ वर्ष, अनिल सुनील कळस्कर वय ६ वर्ष, फायना म.जुनेद फायजानीम महमद जुनेद वय ९ वर्ष, महम्मद सनिफ म.मज्जीद वय १0 वर्ष, मो.मोईन, अतुन खलील, सबा म.जुनेद यांना डेंग्यूसदृश तापाची लागण झाली असून, त्यांच्यावर बुलडाणा खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. लहान मुलांमध्ये थंडी तापाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या साथीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत, तरी आरोग्य विभागाने या साथीला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करावे, अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे. दरम्यान, यासंदर्भात रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.डी.एस.तायडे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, रायपुरात तापाचे रुग्ण आहेत; मात्र एकही डेंग्यूचा रुग्ण आढळला नाही. गावात रुग्णांचे रक्ताचे नमुने घेऊन ते अकोला मेडिकल कॉलेजमध्ये पाठविण्यात येईल; तसेच रायपूर गावात मच्छर मारण्यासाठी धूळ फवारणी केली आहे.