सोनोशी : गत पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने साेयाबीनसह सर्वच पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमाेर दुबार पेरणीचे संकट आहे. शासनाने शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी मदत देण्याची मागणी हाेत आहे.
साेनाेशी परिसरात मृग नक्षत्रात पावसाचे आगमन लांबले. त्यामुळे पेरण्या लांबल्याने आहे त्या पावसात शेतकऱ्यांनी पेरणी केली. पेरणी केल्यानंतर शेतीला पूरक असा पाऊस पडला. पिके काही प्रमाणात उगवलीही. मात्र, त्यानंतर पावसाने सलग पंधरा दिवस दडी मारल्याने कोवळी असलेली कोमे आता सुकून वाळायला लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. बियाण्याचे भाव गगनाला भिडले आहेत. अनेक शेतकऱ्यांना अनुदानावरील बियाणी मिळालेली नाहीत. उसनवारी करून शेतकऱ्यांनी पेरणी केली. आधी महागाई व नंतर अस्मानी संकट यामुळे आता शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. बहुतांश करून शेतकऱ्यांची शेती ही निसर्गावर अवलंबून आहे. दाेन ते तीन दिवस पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे.
पीक कर्जही मिळेना
सलग दुसऱ्या वर्षी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्याची अपेक्षा हाेती. पीक कर्ज मिळेल या आशेवर शेतकऱ्यांनी उसनवारी करून पेरणी केली. मात्र, पीक कर्जही मिळत नसल्याने चित्र आहे. त्यातच दुबार पेरणीचे संकट आल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. शासनाने दुबार पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी हाेत आहे़