रब्बी हंगामाचे नियोजन अडीच लाख हेक्टर; पेरा मात्र २७६२ क्षेत्रावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 03:09 PM2019-11-30T15:09:10+5:302019-11-30T15:09:27+5:30

जिल्ह्यात आतापर्यंत केवळ २ हजार ७६२ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली असल्याचे चित्र आहे.

Rabi season is planned for 2.42 lakh hectares; Sow only on 2762 area | रब्बी हंगामाचे नियोजन अडीच लाख हेक्टर; पेरा मात्र २७६२ क्षेत्रावर

रब्बी हंगामाचे नियोजन अडीच लाख हेक्टर; पेरा मात्र २७६२ क्षेत्रावर

Next

- योगेश देऊळकार  
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कृषी विभागाच्यावतीने अडीच लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणीचे नियोजन करण्यात आलेले आहे. अतिवृष्टीमुळे शेतजमिन ओली असल्याने पेरणीला विलंब झाला. यामुळे अनेक ठिकाणच्या पेरण्या अद्यापही खोळंबल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ २ हजार ७६२ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली असल्याचे चित्र आहे.
यावर्षी कृषी विभागाने सुरूवातीला १ लाख ५७ हजार ७३ हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांचे नियोजन केले होते. मात्र परतीच्या पावसामुळे रब्बी हंगाम लांबणीवर गेल्याने कृषी विभागाला सुधारीत नियोजन करावे लागले होते. त्यानुसार रब्बीचे प्रस्तावित क्षेत्र २ लाख ४२ हजार ८१६ हेक्टरवर पोहचले होते. दमदार पावसामुळे जमिनीमध्ये चांगला ओलावा असल्याने सिंचनाची व्यवस्था नसलेले शेतकरी देखील रब्बी पिकांची लागवड करणार असल्याची शक्यता असल्याने हे वाढीव नियोजन करण्यात आले होते. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुधारीत नियोजनानुसार रब्बीचे क्षेत्र जाहीर करण्यात आले होते. आता नोव्हेंबर महिना संपायला आला असताना जिल्ह्यात केवळ २ हजार ७३२ हेक्टरवर प्रत्यक्षात रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार संग्रामपूर व सिंदखेडराजा तालुक्यात पेरणीला सुरुवात झाली आहे. संग्रामपूर तालुक्यात ५० हेक्टर गहू तर ५७ हेक्टर हरभरा आणि सिंदखेडराजा तालुक्यात २ हजार ६४७ हेक्टर क्षेत्रावर रब्बी ज्वारीची लागवड करण्यात आली आहे.
परतीच्या पावसामुळे जवळपास महिनाभर मुक्काम ठोकल्यामुळे रब्बीची पेरणी लांबणीवर गेली. आॅक्टोबरसह नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस सुरू होता. रब्बी हंगामातील पिकांच्या लागवडीस विलंब झाल्यास उत्पादनात घट येण्याची दाट शक्यता असते.
यामुळे आधीच खरीप हंगाम हातचा गेल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिके घेणे टाळले असल्याचे दिसून येत आहे.

अद्यापही पेरणी अत्यल्प
यावर्षी पावसाळा चांगला झाल्याने जलस्त्रोतांमधील पाणी पातळीत वाढ झाली आहे. जिल्ह्यात एकुण ९१ प्रकल्प आहेत. यापैकी ३ मोठे, ७ मध्यम तर ८१ लघु प्रकल्प आहेत. हे सर्व प्रकल्प पूर्णपणे भरलेले आहेत. जिल्ह्यात सध्या ९८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. यामुळे यावर्षी सिंचनासाठी भरपुर पाणी उपलब्ध आहे. याचा फायदा खरीप हंगामातील पिकांना होणार असल्याचे सुखद चित्र दिसत आहे. मात्र ऐन रब्बी पेरणीच्या वेळेवरच सतत पाऊस सुरू राहिला. यामुळे पेरणीला विलंब झाल्याने आतापर्यंत अपेक्षित पेरणी झाली नाही. असे असले तरी अजुन १५ डिसेंबरपर्यंत पेरणीसाठी अवधी असल्याने यामध्ये वाढ होऊ शकते.

चारा पिकांसाठी पोषक वातावरण
यावर्षी जमिनीमध्ये भरपूर ओलावा असूनदेखील रब्बी हंगामाच्या क्षेत्रात सध्यातरी घट झाल्याचे दिसत आहे. ही परिस्थिती चारा पिकांसाठी मात्र लाभदायी आहे. विलंबाने पेरणी झाल्यास इतर पिकांप्रमाणे चारा पिकांवर याचा कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही. पावसामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने जनावरांच्या चाºयाचा प्रश्न सध्या उद्भवला आहे. भविष्यात आणखी चाराटंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र यावर्षी जमिनीमध्ये असलेला ओलावा व पुरेसी सिंचनाची व्यवस्था यामुळे काही प्रमाणात का होईना, पण पशुपालकांना दिलासा मिळणार आहे.

 

Web Title: Rabi season is planned for 2.42 lakh hectares; Sow only on 2762 area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.