प्रस्थापितांना धक्का

By Admin | Updated: August 7, 2015 01:15 IST2015-08-07T01:15:00+5:302015-08-07T01:15:00+5:30

ग्रामपंचायत निवडणूक निकाल जाहीर; सर्वच राजकीय पक्षांनी केला ग्रामपंचायतींवर दावा.

Push to Installers | प्रस्थापितांना धक्का

प्रस्थापितांना धक्का

बुलडाणा : कोठे फिफ्टी-फिफ्टी, तर कोठे विद्यमान पॅनलला हादरा देत गुरुवारी जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल प्रस्थापितांना धक्का देणारा ठरला. अनेक ठिकाणी मतदारांनी विद्यमान सत्ताधारी पॅनलला नाकारत नव्या लोकांना संधी दिली. यामध्ये तरुणांचा अधिक भरणा दिसून येत आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील जाहीर झालेल्या ५२१ ग्रामपंचायतींपैकी २८ ग्रामपंचायती आणि ८४६ सदस्य अविरोध झाले होते. उर्वरित ४९३ ग्रामपंचायतींसाठी ४ आॅगस्ट रोजी झालेल्या निवडणुकीत ३९५८ उमेदवार रिंगणात होते. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत कुठे पॅनल टू पॅनल, तर काही ठिकाणी विद्यमान सत्ताधारी पॅनलचा सफाया झाला. जिल्ह्यातील बहुतेक मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाल्याचे चित्र आहे. ग्रामपंचायत निवडणूक पक्षाच्या बॅनरखाली लढविली जात नसली तरी अखेरच्या क्षणी राजकीय पुढाऱ्यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीमध्ये अनेकांना तोंडघशी पडावे लागले, तर काहींना आपले गड कायम राखता आले. अनेक ग्रामपंचायतींमध्ये अनपेक्षित निकाल लागल्याने सरपंचपदाचे स्वप्न पाहणाऱ्यांना अपयशाला सामोरे जावे लागले. काही ठिकाणी मागील १०-१० वर्षांपासून सत्तेत असलेल्यांना मतदारांनी हिसका दाखवत नव्या चेहऱ्यांना संधी दिली. यामध्ये तरूणाईचा भरणा अधिक आहे. कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायत निवडणुकीत तरुणाई रिंगणात उतरली. जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या असलेल्या काही ग्रामपंचायतींमध्ये एकाच पॅनलला बहुमताने निवडून देण्याची किमया यावेळी प्रथमच पाहावयास मिळाली. गुरुवारी जाहीर झालेल्या निकालावरून ग्रमीण भागात पुन्हा एकदा नवे सत्तांतर घडणार असल्याचे दिसत आहे. दरम्यान, काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक व जिल्हास्तरीय नेत्यांनी आपल्याच विचारांच्या जास्तीत जास्त ग्रामपंचायती निवडून आल्याचे दावे प्रतिदावे केले आहेत. एकूणच या निवडणुकीत मतदारांनी प्रस्थापितांना हात दाखवत तरुणाईच्या हातात सत्ता दिली. अनेक पदाधिकाऱ्यांना हादरे बसले आहेत.
तालुकानिहाय घोषित झालेले अविरोध व निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांची संख्या पुढीलप्रमाणे... बुलडाणा तालुका अविरोध ८५, निवडून दिलेले ४२८, चिखली -अविरोध ५३, निवडून दिलेले ५२३, देऊळगावराजा -अविरोध २०, निवडून दिलेले २०४, सिंदखेडराजा- अविरोध ६८, निवडून दिलेले २८९, मेहकर- अविरोध १०४, निवडून दिलेले २६३, लोणार- अविरोध ४०, निवडून दिलेले १३०, मलकापूर-अविरोध ७०, निवडून दिलेले २१७, मोताळा- अविरोध १०२, निवडून दिलेले ३९३, नांदुरा- अविरोध ७८, निवडून दिलेले ३२८, खामगांव- अविरोध ७९, निवडून दिलेले ५७८, शेगाव- अविरोध ५५, निवडून दिलेले २०२, जळगाव जामोद- अविरोध ६२, निवडून दिलेले १८६ आणि संग्रामपूर- अविरोध ४८, निवडून दिलेले २३० सदस्य आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात १ हजार ९८० प्रभागांमधील ४ हजार ८१७ जागांसाठी ८४६ सदस्य अविरोध, तर ३ हजार ९७१ सदस्य निवडून दिल्या गेले. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने विजयी मिरवणूक काढण्यास बंदी घातल्याने अनेकांचा हिरमोड झाला.

 

Web Title: Push to Installers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.