लहान मुलास धडक मारून जखमी करणाऱ्यास शिक्षा, दोन लाख रुपयांच्या नुकसान भरपाईचे आदेश
By अनिल गवई | Updated: July 12, 2024 22:18 IST2024-07-12T22:17:48+5:302024-07-12T22:18:40+5:30
पळशी बु. येथील संतोष श्रीराम धनोकार ४७ यांचा दहावर्षीय सार्थक नावाचा मुलगा २७ जानेवारी २०१८ रोजी सायंकाळी घरासमोर खेळत होता. त्यावेळी शिवाजी काशीराम ठाकरे ३० रा. बोरी अडगाव याने आपल्या ताब्यातील दुचाकी निष्काळजीपणे व भरधाव वेगात चालवून सार्थकला ठोस मारली...

लहान मुलास धडक मारून जखमी करणाऱ्यास शिक्षा, दोन लाख रुपयांच्या नुकसान भरपाईचे आदेश
खामगाव: घरासमोर खेळत असलेल्या दहा वर्षीय मुलास धडक मारून जखमी करणाऱ्यास गुन्हा सिध्द झाल्याने खामगाव येथील न्यायालयाने दोन महिन्यांच्या कारावासासह सहा महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. हा महत्वपूर्ण निकाल प्रथम वर्ग न्यायाधीश कोर्ट क्रमांक २चे न्यायाधीश ओंकार साने यांनी शुक्रवारी दिला.
पळशी बु. येथील संतोष श्रीराम धनोकार ४७ यांचा दहावर्षीय सार्थक नावाचा मुलगा २७ जानेवारी २०१८ रोजी सायंकाळी घरासमोर खेळत होता. त्यावेळी शिवाजी काशीराम ठाकरे ३० रा. बोरी अडगाव याने आपल्या ताब्यातील दुचाकी निष्काळजीपणे व भरधाव वेगात चालवून सार्थकला ठोस मारली. त्याच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत केली. त्यामुळे त्याला अकोला येथील अस्थिरोग तज्ज्ञांकडे भरती करण्यात आल्याची तक्रार खामगाव ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये केली. तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि कलम २७९, ३३७, ३३८ आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १३४ अन्वये गुन्हा दाखल केला. तपासाअंती पोलिसांनी दोषारोपपत्र खामगाव येथील न्यायालयात दाखल केले.
गुन्हा सिध्द करताना न्यायालयाने सहा साक्षीदार तपास तपासले. अभियोग पक्षाच्या वतीने विशेष सहा. सरकारी अभियोक्ता अजय इंगळे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरण्यात येऊन कोर्ट २ चे प्रथमवर्ग न्यायाधीश ओंकार साने यांनी आरोपीस दोषसिध्द ठरवून भादंवि कलम २७९ मध्ये दोन महिने साधा कारावास, कलम ३३८ मध्ये सश्रम कारावास आणि मोटार वाहन कायदा कलम १३४ मध्ये १०० रूपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच जखमी सार्थक धनोकार यास दोन लाख रूपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला.