आठ हेक्टरवरील तुरीचे पीक धोक्यात
By Admin | Updated: November 20, 2014 23:49 IST2014-11-20T23:49:36+5:302014-11-20T23:49:36+5:30
अळ्यांचा प्रादुर्भाव : पीक वाचविण्यासाठी उपाययोजनांची गरज

आठ हेक्टरवरील तुरीचे पीक धोक्यात
खामगाव : गेल्या दहा ते बारा दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला. तर मागील आठवड्यात पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. या ढगाळ वातावरणामुळे ऐन बहारात आलेल्या तुरीच्या पिकावर शेंगा पोखरणार्या अळ्यांनी आक्रमण केल्याने तालुक्यातील ७ हजार ६५0 हेक्टरवरील तुरीचे पीक धोक्यात आले आहे.
यवर्षीचा खरीप हंगाम शेतकर्यांसाठी जीवघेणा ठरू पाहत आहे. गत ७ ते १0 वर्षात प्रथमच एवढय़ा बिकट परिस्थितीतून शेतकरी वाट काढत आहे; मात्र तरीही निसर्गाच्या प्रकोपाने शेतकरी पार भरडला जात आहे. तालुक्यात खरीप पिकासाठी सरासरी ७५0 मिमी पर्जन्यमानाची गरज आहे; मात्र यंदा जून ते ५ नोव्हेंबरपर्यंत ४८१.५३ मिमी पावसाची नोंद आहे. अनियमित व अपुरा पाऊस पिकांच्या वाढीसाठी पुरेसा नव्हता. त्यामुळे पिकांची वाढ असमानधारकक झाली. अपुर्या पावसामुळे मूग, उडीद, ज्वारी, सोयाबीन व कपाशी या पिकाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. पेरणीसाठी व मशागतीसाठी लागलेला खर्चही ही पिके काढू शकली नाही. खरिपातील पिकांना पाहिजे त्या प्रमाणात व वेळेवर पाऊस न झाल्याने उत्पादनाला फटका बसला आहे.
खरिपातील अखेरचे पीक म्हणून तुरीकडे पाहिले जाते. कपाशी व तुरीला शेतकरी हमी पीक समजतात. यामधील कपाशीला जरी फटका बसला तरी तुरीचे बहरत असलेले पीक पाहून शेतकर्यांना दिलासा वाटत होता; मात्र गत ५ ते ६ दिवसांपासून तुरीच्या पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. सद्य:स्थितीत तुरीचे पीक फलोरा, कळ्या व शेंगा भरण्याच्या मोसमात आहे. तर नुकताच अवकाळी पाऊसही बरसला आहे; मात्र ऐन बहाराच्या सुरुवातीच्या काळातच शेंग पोखरणार्या अळ्यांनी आक्रमण करून तुरीचे पीक धोक्यात आले आहे. एकेका झाडावर अनेक अळ्या असल्याने तुरीच्या शेंगा पोखरल्या जात आहेत. या प्रादुर्भावाने खरिपातील अखेरच्या उरल्या-सुरल्या शेतकर्यांच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक गावातील कृषी सहाय्यकाने गावात कार्यक्रम घेऊन शेतकर्यांना उपाययोजनाबाबत माहिती द्यावी, अशी मागणी शेतकर्यांकडून होत आहे.
दरम्यान, तालुक्यातील पाळा शिवारात उपविभागीय कृषी अधिकारी अनिल बोंडे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे शास्त्रज्ञ डॉ. टी.एच. राठोड, तालुका कृषी अधिकारी जाधव, कृषी अधिकारी जी.सी. कोठारी, आर.व्ही. मय्यर, एस.एम. देशमुख यांनी तूर पिकावरील कीड पाहणी केली व उपस्थित शेतकर्यांना कीड रोगाबाबत मार्गदर्शन केले.