पीएसपीएसच्या आरोपींनी केली पोलिसांची दिशाभूल

By Admin | Updated: August 13, 2014 00:33 IST2014-08-13T00:33:07+5:302014-08-13T00:33:07+5:30

जनतेला सहा कोटींचा गंडा घालणार्‍या आरोपींनी तपासामध्ये पोलिसांची दिशाभूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

PSPS accused have misled the police | पीएसपीएसच्या आरोपींनी केली पोलिसांची दिशाभूल

पीएसपीएसच्या आरोपींनी केली पोलिसांची दिशाभूल

देऊळगावराजा : तालुक्यातील जनतेला सहा कोटींचा गंडा घालणार्‍या पीएसपीएस कंपनीचे मुख्य संचालक रवींद्र भागोराव डांगे, संचालक अशोक प्रभाकर गायकवाड यांची सात दिवसांची पोलिस कोठडी आज १२ ऑगस्ट रोजी संपली. न्यायालयाच्या निर्देशानुसार दोघा आरोपींची रवानगी आता परभणी कारागृहात करण्यात आली आहे. दरम्यान, या दोन्ही आरोपींनी तपासामध्ये पोलिसांची दिशाभूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पीएसपीएस मल्टीट्रेड सर्व्हिस प्रा.ली. परभणीच्या कंपनीने राज्यभरात एजंटांच्या माध्यमातून करोडो रुपयांची माया जमा केली. हा सर्व प्रकार अवघ्या सहा महिन्याच्या काळात झाला. दे.राजा तालुक्यातून शेकडो लोकांनी कंपनीच्या व एजंटांच्या अमिषाला बळी पडत यामध्ये करोडो रूपये गुंतवले. केबीसीपाठोपाठ पीएसपीएस कंपनीनेही गाशा गुंडाळल्याने या तालुक्यातील शेकडो लोकांची करोडो रूपयांची फसवणूक झाली. दे.राजा पो.स्टे.मध्ये पीएसपीएस कंपनीच्या समाधान दामोधर मोरे या एजंटवर गुन्हा दाखल होता. त्या आधारे परभणी पोलिसांच्या अटकेत असलेले रवींद्र डांगे, अशोक गायकवाड या दोघांना परभणी न्यायालयाने दे.राजा पोलिसांच्या ताब्यात दिले. सदर आरोपींना दे.राजा न्यायालयाने सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. या काळात पोलिसांनी ६७ गुंतवणूकदारांचे बयाण नोंदवल्यानंतर प्रारंभी एक कोटीचा आकडा सहा कोटीपर्यंत पोहोचला; मात्र सक्षम कागदपत्रांची मागणी दे.राजा पोलिसांनी केल्याने शेकडो गुंतवणूकदारांचे यात बयाण घेतल्या गेले नाही. डिगांबर कोल्हे यांच्या तक्रारीवरून कंपनीचा एजंट समाधान मोरेवर दे.राजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला; मात्र इतर एजंट मोकळेच राहिले. लातूर शहरात तेथील पोलिस गुन्हा दाखल करू शकतात. मग दे.राजा पोलिसांची अडचण का होते, अशी चर्चा गुंतवणूकदारांमध्ये सुरू आहे. पीएसपीएस कंपनीत पैसे गुंतवलेले अनेकजण एजंटांच्या विरोधात तक्रार द्यायला तयार असताना त्यांची तक्रार घेतली जात नाही. असाही आरोप गुंतवणूकदारांमधून होत आहे. आजही अनेक गुंतवणूकदार पैसे परत मिळण्याची भाबडी आशा धरून आहेत. सात दिवस पोलिस कोठडीत असलेल्या दोन आरोपींनी तपासी अधिकार्‍यांचीच दिशाभूल करण्याची बाब समोर येतेय. पहिल्या टप्प्यातील पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर आरोपींना दे.राजा न्यायालयात हजर केले असता, उर्वरित मालमत्ता सील करण्यासाठी पोलिसांनी आरोपींच्या पोलिस कोठडीची मागणी केली व न्यायालयाने ती मान्यही केली; पण दे.राजा पोलिसांना आरोपीची एक रूपयाचीही मालमत्ता सील करण्यास अपयश आले आहे, कारण सर्व मालमत्ता परभणीच्या गुन्हे शाखेने अगोदरच सील केल्याचे उघड झाले. गेल्या सात दिवस सुरू असलेल्या तपासाबाबत प्रसिद्धी माध्यमांना देण्याचे तपास अधिकारी ठाणेदार अंबादास हिवाळे यांनी टाळले.

Web Title: PSPS accused have misled the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.